टकमकीच्या जोडीचा `हिरकणीचा कडा` तितक्याच कडालोटीचा नि नजरफाट घसरणीचा. टकमक नि हिरकणी म्हणजे रायगडाच्या भव्यतेचे दोन विशाळ डोळेच म्हटले तरी चालतील. या कड्याचा एक इतिहास आहे. हिरकणी नावाची पाचाड नजीकच्या कोळस गावची एक गवळण दुधाचा रतीब घालायला गडावर आली असताना, जाबता-बंदीची सायंकाळची तोफ उडाली नि गडाचे दरवाजे बंद झाले. तिचे तान्हे मूल घरी नि घरची वाट तर झाली बंद ! आईचे काळीज ते! तटातटा तुटू लागले. काळोख पडल्यावर हिरकणी त्या निसटत्या तुटत्या कड्यावरून मोठ्या शिताफीने निसटून गेली कोळंसला आपल्या घरी तान्ह्याला पाजायला. दुसऱ्या दिवशी पहाटे रोजच्याप्रमाणे दूध घेऊन हिरकणी गडाच्या दरवाजावर आलेली पाहून, गडकरी चमकले. `अरेच्चा! काल संध्याकाळी ही गडावर अडकून राहिली होती नि आता कशी खालून वर आली?` त्यांनी महाराजांकडे वर्दी दिली. ह्या वेळपावेतो रायगड अभेद्य समजला जात होता. एकदा दरवाजा बंद झाला का आतला माणूस बाहेर जायचा नाही, बाहेरचा आत शिरकायचा नाही. चोहीकडून गड चढा-उतरायची तर सोयच नव्हती आणि प्रकार पहावा तर हा असा! महाराजांनी हिरकणीला बोलावून चौकशी केली. "आईचं काळीज, गेलं वाट काढीत मायबाप. त्याला गड काय नि कपारी काय!" असे तिने सरळ उत्तर दिले. एक साधी गवळण बाई जर या कड्यावरून सहज जाऊ शकते, तर गनिमाला काय कठीण? महाराजांनी त्या तुटत्या कड्यावर भक्कम पाषाणांची तटबंदी करून घेतली. `करून घेतली` असे लिहिणे फार सोपे आहे. पण खोल खालवर सुमारे २५०० फूट सुळक्यासारख्या सरळ तुटलेल्या कड्यावर आणि ते सुद्धा वरचा १००-१५० फूट भाग सोडून मध्यंतरीच हे बांधणीकाम केले असेलच कसे, हे तत्कालीन आश्चर्य आज घडीलाही लवमात्र कमी झालेले नाही.
- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रायगड : यात्रा दर्शन - माहिती