महाराष्ट्रात प्रत्येक गावी आढळून येणाऱ्या महार लोकांच्या वस्तीवरून रुढ झालेल्या `गाव तेथे महारवाडा` या वाक्यप्रचारावरून आणि या वाक्यप्रचाराबाबत वर केलेल्या विश्लेषणावरून महाराष्ट्रात महार हे मूळचे लोक असावेत याला पुष्टी मिळते. वामन भट यांनी Harijans of Maharashtra या ग्रंथात महारांच्या गत वैभवाची जी कल्पना उभी केली आहे त्याला ऐतिहासिक आधार देवून या भूप्रदेशातील महार एकेकाळी समाजातील प्रमुख वर्ग वैभवशाली जीवन जगणारे, राज्य करणारे लोक होते हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात पूर्वी महारांची राज्ये होती म्हणून या प्रदेशास महाराष्ट्र हे नाव पडले असावे, हे वेडेन पॉवेल यांनी ठासून सांगितले आहे. हिंदूतील महार या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीवरून `महाराष्ट्र` हे नाव पडले असावे अशा त-हेचे मत मॉल्सवर्थ यांनी आपल्या मराठी शब्दकोशात सांगितले आहे तर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी `महाराष्ट्र` या शब्दाचा अन्वयार्थ लावताना `महार` या शब्दाची उत्पत्ती देवून असे दाखवून दिले आहे की या महाराष्ट्रभूमीत मूळचे रहिवाशी महार हे होत व त्यांच्या नावावरूनच या भूप्रदेशाला `महाराष्ट्र` असे नाव पडले असावे. या विद्वानांच्या विविध मतांवरून हेच स्पष्ट होते की महारांचे मूळ वस्तीस्थान सध्या महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश हाच असावा व महारांची मूळ भूमी हीच असावी यात काही शंका वाटत नाही.
महार एक शूर जात, पृ. ६७
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : महार एक शूर जात