संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय चळवळीतला रोमहर्षक असा लढा. या लोकलढ्याची व्याप्ती आणि विस्तार हा बहुल स्वरूपाचा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे डावे-समाजवादी पक्ष आणि लालबावटा कलापथकाची कामगिरी संस्मरणीय आहे. अण्णा भाऊंच्या वाङ्मयात या चळवळीतील महाराष्ट्र संकल्पनेचा विलोभनीय असा आविष्कार आहे. कामगारांच्या झुंजार शौर्यगाथा ते खुरप्या दोऱ्याची श्रमणसंस्कृती त्यांच्या महाराष्ट्र संकल्पनेत आहे. त्यांची इतिहासपरंपरेकडे पाहण्याची दृष्टी नवी आहे. `अठरापगड जातीला बोलवा संयुक्त करण्याला` किंवा `साधूंनी मुंबई विशाल` असे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आणि राजकीय प्रतिकाराची भावना त्यांच्या शाहिरीत होती. `उद्याच्या नवमहाराष्ट्रासाठी` आणि `लोकशाहीच्या नंदनवनासाठी बोलवा आता सकलांना` असे आवाहन त्यामध्ये होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे यांच्या कामगिरीचा विस्तृत परामर्श डॉ. शरद गायकवाड यांनी या पुस्तिकाद्वारे घेतला आहे. या चळवळीतील अण्णा भाऊंचा सहभाग आणि त्यांच्या काव्यातील एकसंध महाराष्ट्र स्वप्नाचा गायकवाड यांनी घेतलेला प्रतिसाद शोध महत्त्वपूर्ण आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा पैलू या ग्रंथातून प्रथमतःच समोर येतो आहे. त्यामुळे या चळवळीचा इतिहास, वाटचाल, अंतर्विरोध आणि उत्तरकाळामध्ये त्यासंबंधी निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा डॉ. गायकवाड यांनी केली आहे, ती महत्त्वाची आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची व्याप्ती-फलश्रुतीचा मागोवा त्यांनी ओघवत्या अशा भाषेत घेतला आहे. अण्णा भाऊंचे या चळवळीतले प्रत्यक्ष धागेदोरे आणि त्यांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न, राजकीय प्रतिकाराची भावना, आविष्कार आवाहनपरता जाणून घेण्यासाठी हे लेखन महत्त्वाचे ठरते. संयुक्त महाराष्ट्राविषयी `बिणी मारायची अजून राहिली` ही अण्णा भाऊंच्या मनातील तगमग आजही अधुरीच आहे. त्यांच्या अस्वस्थ शाहिरीची प्रेरक आठवण करून देणारे हे कथन कार्यकर्ते वाचकांना नवी दृष्टी देईल.
- प्रा. रणधीर शिंदे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि - अण्णा भाऊ साठे