गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेला एक उपक्रम नुकताच थांबला. हा उपक्रम होता विचारवेध संमेलनांचा. दरवर्षी साधारणपणे डिसेंबरच्या गारव्यात महाराष्ट्रातील वैचारिक गारठा कमी करण्याचा एक गंभीर प्रयत्न या पंधरा संमेलनांनी केला. महाराष्ट्राच्या विविध विभागांतील लहानमोठ्या शहरांतून साताऱ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या विद्यमाने आणि स्थानिक मंडळींच्या सहकार्याने ही संमेलने आयोजित केली गेली. समाजात ज्ञानाची भूक एवढी मोठी आहे की सर्वत्र रसिक व जिज्ञासू श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद त्यांना लाभत गेला. विद्वज्जनांच्या विद्यापीठीय चर्चासत्रापेक्षा समाजाभिमुख अभ्यासक आणि अनुभवी कार्यकर्ते यांच्यातील वैचारिक आदानप्रदानाचे स्वरूप या संमेलनांचे होते. सर्व पुरोगामी, इहवादी, विज्ञानवादी, समताग्रही आणि परिवर्तनवादी प्रवाहांचा त्यात सहभाग होता. वैचारिक मंथनाविषयी आस्था आणि आपल्या विचारांची वेळोवेळी स्पष्टता करून घेण्याची निकड यावर त्यांच्यात एकवाक्यता होती. जागतिक स्तरावर नवभांडवलशाही आणि देशांतर्गत धर्मवादी शक्ती वैचारिक असहिष्णुतेला आणि अविवेकी मठ्ठपणाला खतपाणी घालत असल्यामुळे तर या मंथनाची व स्पष्टतेची त्यांना अधिकच गरज भासत होती. विचारवेध संमेलने त्यांची ती गरज भागवत असत. महाराष्ट्राच्या विचारविश्वात सजग नागरिकांचे एक सतत वाढत-विकसत गेलेले सकस व चितनशील व्यासपीठ हे स्थान त्यामुळेच या संमेलनांना लाभले होते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : विचारवेध संमेलन अध्यक्षीय भाषणे खंड-२