"या सर्व स्त्रियांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळ, असहकार आंदोलन, भूमिगत चळवळ यामध्ये झोकून दिले आहे, सामाजिक रूढी, प्रथा, देशाचे पारतंत्र्य याविरुद्ध त्या लढत आहेत. १९३०-४० दशकातील स्त्रियांच्या पिढीचा हा संघर्ष बाह्यसंघर्ष आहे. गांधी व आंबेडकरांनी स्त्रियांना घर कुटुंबाच्या चौकटी बाहेर आणून सामाजिक राजकीय चळवळीत कृतिशील केले. सार्वजनिक जीवनातील या महत्वपूर्ण योगदानाच्या संदर्भात या स्त्रिया आपला हेतूपूर्ण एकात्म स्व घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु स्वातंत्र्य चळवळीनंतर स्त्रियांना पुन्हा `घर`- कुटुंब या बराकीत परत पाठविण्यात आले. स्त्रियांसंबंधी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित उदारमतवादी दृष्टिकोण घेऊन सामाजिक-राजकीय जीवनामध्ये खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समतेच्या विकासाचे प्रारूप निर्माण झाले नाही. स्वातंत्र्यानंतर स्त्रियांसाठी राजकीय समता निर्माण होण्यासाठी स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढविणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षामध्ये स्त्री सहभागाच्या संधी घटवल्या गेल्या. कुटुंब, विवाह हेच स्त्रीचे क्षेत्र पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले. स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे सामाजिक जीवनात स्वतंत्रता अनुभवणाऱ्या स्त्रिया व्यक्तीवादी, अस्तित्वलक्ष्यी, बंडखोर जाणिवांचा त्याग करून पारंपरिक संकेतव्यूहातील विवाह कुटुंब या संस्थांना शरण जातात."
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : स्त्रीवाद आणि १९७५ नंतरची मराठीतील आत्मचरित्रे