या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकाने अनंत सूर्यमंडळांसह त्यांच्या ग्रहोपग्रहांसहित तत्संबंधी एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले आहे. त्यापैकी आपण सर्व मानव स्त्री-पुरुषांनी त्याविषयी काय काय करावे आणि आपण सर्व एकंदर मानवस्त्रीपुरुषांनी त्यांचे स्मरण मनी जागृत ठेऊन एकमेकांशी कोणत्या त-हेचे आचरण केल्यामुळे त्यास आनंद होणार आहे यास्तव मी त्याच्या कृपेने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांच्या हितासाठी हा लहानसा ग्रंथ रचिला आहे. तो सर्वांस ग्राह्य होऊन आम्ही सर्वांनी निर्मिकाच्या सत्यमय राज्याचा सारखा उपभोग घेऊ लागावे म्हणून माझी त्यापाशी मागणी आहे. जे काही मी माझ्या अल्पबुद्धयनुसार या ग्रंथांत लिहिले आहे, त्यांत जी आमच्या मानव स्त्रीपुरुष विद्वान् व सूज्ञ वाचणारांच्या ध्यानांत व्यंगे दिसून येतील, त्यांविषयी त्यांनी क्षमा करून गुणलेशाचा स्वीकार करावा, अशी त्या सर्वांस माझी विनंती आहे. आणि जर करिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग सार्वजनिक अयोग्य किंवा खोटा दिसला तो किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यांस काही सत्य विचार सुचविणे असेल तर ते त्यांनी वर्तमानपत्राद्वारे आम्हांस कळवावे, म्हणजे ते, खरेच विचारी पुरुषांचे असल्यास आम्ही कृतज्ञतापूर्वक मान्य करून दुसऱ्या आवृत्तीत दाखल करूं. हा ग्रंथ आम्हास विस्ताराने लिहावयाचा होता परंतु एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांस आपआपले प्रपच आवरून जर हा ग्रंथ त्यांस वाचता न येईल तर एकंदर सर्व रिकामटेकडे धूर्त त्यांस लुटून खातील. यास्तव एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक" असे नाव दिले आहे. यास्तव सर्वांनी योग्य आश्रय दिल्यास दुसरी आवृत्ति आम्हास, सुधारून व तीत नवीन पुराव्यासह कृत्रिमी थोतांडी ग्रंथांचे खंडण करण्याची हिम्मत येईल.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक