भीमगीतांची एक सरळ परंपरा आहे. सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे यांच्याशी ही `कव्वाली परंपरा जोडली गेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, त्यांनी उभारलेल्या चळवळीचा प्रभाव या गीतरचनांवर झालेला आहे. भीमराव महामूनी, भीमराव कर्डक, शाहीर घेगडे यांच्या प्रयत्नाने `जलसे ते कव्वाली` असा प्रवास झाला. कव्वालीवर मुस्लिम `कव्वाली` परंपरेचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यातूनच पुढील काळात गायनपार्ट्या व त्यांचे सामने सुरु झाले. सामन्यांच्यामुळे एक श्रोतृवर्ग तयार झाला. त्यांच्या सोबतच भीमगीते लिहिली जाऊ लागली आणि गायकांची गायकीही तयार होत गेली. साध्या सोप्या भाषेत गाणी लिहिली गेली गायन परंपरेत `वंदन गीते`, `जयंती गीते`, `बाबासाहेबांच्या चरित्रावर` आधारित गाणी लिहिली गेली. कुटुंबांची गाणी, मुलांना समजावून सांगणारी `संस्कार गीते` व चळवळीतले प्रसंग जिवंत करणारी `चळवळीची` गाणी लिहिली गेली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाचे वर्णन `शोकगीते` म्हणून केले गेले. चळवळीत ज्यांना वीरमरण आले त्या `शहिदांना` वंदन करणारी स्फूर्ती गीते या काळात लिहिली गेली आहेत. या कालखंडाचे लेखन नेतृत्व वामनदादा कर्डक यांनी केल्याचे दिसते. श्रावण यशवंते यांच्या गोड आवाजात कितीतरी गाणी ध्वनिमुद्रित झाली व समाजात प्रियही ठरली. वामनदादा कर्डकांचे लोक ढंगातील "ह्यो ह्यो पावना" गाणे खूप लोकप्रिय झाले पण त्याचसोबत वामनदादांचे गीतही लोकप्रियच होते. "उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” हे ते गीत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीने प्रसारित होऊन लोकसंगीत कार्यक्रमाद्वारे जनतेपर्यंत पोहचत होते.
- प्रा.डॉ. विठ्ठल शिंदे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भीमगीताबाबत