चळवळीत काम करणारे, साहित्यात काम करणारे, राजकारणात लढणारे, नाट्यकला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे, राबराबराबत जीवन जगणारे नवे क्षेत्र जगण्यासाठी निवडणारे पुरुष आणि त्यांचे कुटुंब नेमके कसे जगते याची चित्तरकथा यात आहे.
चळवळीला वाहून घेतलेल्या या पराक्रमी पतींच्या पत्नी संसार कसा करत असतील, चळवळींची पार्श्वभूमी नसलेल्या या महिला लग्नानंतर या अस्वस्थ वातावरणाशी कशा जोडल्या गेल्या असतील, या संबंधीची माहिती हे पुस्तक वाचून मिळेल.
खेड्यात चुलीवरचा संसार सांभाळत कल्पना दुधाळ नाती कशी टिकवून ठेवते, नावारूपाला येणाऱ्या कवीपुत्राचा मृत्यू पाहून विद्या काळसेकरांना काय वाटले असेल, घरात कसलंही लक्ष देणार नाही असी भीष्मप्रतिज्ञा लग्नाअगोदर करणाऱ्या इंद्रजीत भालेरावांच्या पत्नी गया यांनी संसार कसा ओढला असेल, दारिद्र्यात आणि संघर्षात रुतलेल्या वीराची पत्नी काय विचार करीत असेल, वीजबील परवडत नाही म्हणून कंदिलाच्या उजेडात लिहितं होणाऱ्या दत्ताला पाहून प्रतिभाला तिच्या भावी आयुष्याविषयी काय वाटलं असेल....
अशा महिलांची विविध रूपं इथं पाहायला मिळतात. प्रत्येक रूप संघर्षातून पुढे जात एक युद्धकथा बनली आहे. समाज, पुरुष, परंपरा, रूढी यांना स्त्री समजून घेण्यासाठी या ग्रंथाची खूप मोठी मदत होणार आहे असे मला वाटते.
- उत्तम कांबळे (मलपृष्ठवरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : लढणाऱ्या महिलांच्या युद्धकथा