डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या `जनता` पत्रातील लेखांच्या संग्रहाचा हा ग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. अरुण कांबळे यांनी संपादित करून वाचक व संशोधक यांची बरेच वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. यातील सर्व लेख मुळाबरहुकूम पहिल्यांदाच प्रसिद्ध केले जात आहेत. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. हे अत्यंत जिकिरीचे व संशोधनाचेच काम आहे. डॉ. आंबेडकरांचे मराठी लेखन प्रसिद्ध करीत असताना अनेकदा त्यात मूळ इंग्रजी लेखांचे वा त्यांच्या ग्रंथातील उताऱ्यांचे भाषांतर करून तेच मराठीतील लेखन म्हणून प्रसिद्ध केले जाते, तसे या ग्रंथात केले गेले नाही. या ग्रंथात डॉ. आंबेडकरांचे मूळ मराठीतील ४१ लेख आहेत. हे सर्व लेख मुळातून वाचावेत, अभ्यासावेत असेच आहेत. ५० वर्षानंतरही त्यांची उपयुक्तता आजही प्रकर्षाने जाणवते आहे. या सर्व लेखांतून डॉ. आंबेडकरांची कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रश्नांना मुळात जाऊन भिडण्याची व त्यावर सांगोपांग विचार स्पष्टपणे मांडण्याची त्यांची हातोटी ध्यानात येते. सामाजिक, धार्मिक, राजकीय विषयांवरील त्यांचे विचार मूलगामी स्वरूपाचे आहेत. पुरोगामी भारतीय समाजाच्या जडणघडणीत डॉ. आंबेडकरांच्या या विचारांमुळे फार मोठे व मोलाचे कार्य केले आहे. प्रा. अरुण कांबळे यांची ४० पानांची प्रदीर्घ प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखी आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा, कार्याचा धांडोळा त्यांनी येथे समर्थपणे घेतला आहे. मराठी वाचक या ग्रंथाचे मनःपूर्वक स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जनता पत्रातील लेख