योगिनी सातारकर - पांडे यांच्या `जाणिवांचे हिरवे कोंभ` या कवितासंग्रहातून सभोवतालच्या वास्तवाकडे पाहणारी एक संवेदनशील नजर सामोरी येते. तंत्रज्ञानाने आधुनिक झालेल्या नव्या जगात अजूनही जुन्याच व्यवहारांच्या साच्यात भरडून निघणाऱ्या स्त्रीमनाच्या संवेदनांचे तरल हुंकार या कवितांमध्ये ऐकू येतात. सभोवतालचे वास्तव ज्या झपाट्याने बदलते आहे त्यातील बदलांना सामोरे जातानाची वाट स्त्रीला कधीच सोपी नसते. स्वतःचे घर, मुले, नातेवाईक, पती वा सोबती, काम आणि कामाच्या ठिकाणचे सहकारी, रस्ता आणि तिथले जग, प्रसारमाध्यमे या विश्वात वावरणाऱ्या स्त्रीच्या वाट्याला तिचे अस्तित्व ढवळून टाकणारे अनेक अनुभव येत असतात. शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर परंपरेच्या दडपणाखाली घुसमटणाऱ्या स्त्रीमनाला आस असते ती स्वतःला आणि या प्रवासाला समजून घेणाऱ्या सोबतीची. योगिनी सातारकरांच्या कवितेत या साऱ्या अनुभवांच्या काहीशा पृष्ठस्तरीय आकलनाची एक दिशा दृग्गोचर होताना दिसते. या अनुभवांच्या सखोल खाली दडलेले, विविध प्रकारचे ताणेबाणे विणलेले संस्कृतींचे अंतःस्तरीय विश्व त्यांच्या नेणीवेत आहे हे त्यांच्या कवितेतल्या शब्दकळेत जाणवते. ते अनुभव पेलण्याचे आणि शब्दकळेतून दृग्गोचर करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कवितेला अधिकाधिक मिळत राहो, ही शुभेच्छा.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जाणिवांचे हिरवे कोंभ