आपले अस्तित्व पणाला लावत बळीचा वंश तगवून धरण्याच्या काळात वारसाहाती. नांगराचा फाळ देण्याऐवजी पुढच्या काळाच्या सावध हाका ऐकणारी ही कविता आहे. घामाने भिजलेली माती, सातबाऱ्यातून झिजत भिजत सरकणाऱ्या देहाच्या हाती काहीही उरलेले नाही. आपली मातीपासून तुटत चाललेली नाळ आणि हातातून सुटत चाललेल्या काळाचे गणित या कवितेला कळेनासे झाले आहे. तरीही मातीतून आभाळाकडे जाण्याची स्वप्नं पाहणाऱ्या माणसांसाठी पसायदान मागण्याची ऐपत ती ठेवते. या आशावादी पार्श्वभूमीवर आपल्याला गवसलेल्या सृजनशील वाटा नव्या उगवतीच्या दिशा देऊन जातात.
मातीबरोबर आलेली निरुत्तरता सोसताना आपल्यात जिवंत असलेले अवशेष व्यवस्थेने आवळलेल्या बंद मुठीत केव्हाच गडप झालेत. त्याची मांडणी नीटपणे कोणत्याही दस्तऐवजात होत नाही, ना कोणत्या कवितेतही असा हा वांझ काळही या कवितेच्या माध्यमातून सरकताना दिसतो. त्यातील दुःखाचे, दमणाचे घाट तुकारामाच्या वाटेनेच आम्ही या काळातही चालतच आहोत. कारण त्याला अंतर- गत्यंतरही नाही. आमची दुःखही आम्हीच सोसायची, शिकता-वाचताना लिहायचीसुध्दा आहेत. आतातर या वांझोट्या काळात दुःखाचे श्वापद सोसायला सावज निर्माण होण्याची गोष्ट इतिहासातून सांगण्याचे भाकीत पुढे उभे आहे.
येण्याऱ्या काळाचे सुतोवाचही ही कविता आपल्याला देऊ पाहते आहे. “आउटडेटेड वाटतेय । कष्ट करून मातीतून मोती पिकवण्याची गोष्ट कागदावरच्या परीक्षा पास झालेल्या लेकरांना ।” या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उत्तराधुनिक साधनांनी भुई सावरण्याची नवी गोष्ट जन्माला येणार नाही. तरीही तिला मातीच्या मुळांपासून तुटून काळाच्या धगीत जातानाची गोष्ट सलत जाते.
"मुळं तुटू नये माती सुटू नये । फाटू नये भुई। नदीही आटू नये कधीच उरातली...।" असे उगाचच वाटत जाते. कवीने ही चार सर्गात मांडलेली गोष्ट आपला भाषिक अवकाश घेऊन, वेगवेगळ्या काळाच्या आयामांनी आपल्या समोर ठेवली आहे. त्याला समकालीन वास्तवाचे काठपदर आहेत.
(मुखपृष्ठावरील)
- दा.गो.काळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जळताना भुई पायतळी