रामायणाचा नायक असलेल्या रामाविषयी कोणती भूमिका घ्यायची, याविषयी आपल्या समाजात गेली दोन-सव्वा दोन हजार वर्षे उलटसुलट चर्चा चालू आहे.रामाबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काही लोक आणि विशेषतः पुरोगामी चळवळींतील लोक `अन्यायी राजा` म्हणून त्याच्यावर कठोर टीका करतात. याउलट, बहुसंख्य लोक त्याच्याविषयी नितान्त श्रद्धा बाळगतात. शिवाय, विशिष्ट विचारसरणीचे लोक त्याच्याविषयी मनात अशी श्रद्धा नसूनही बहुजनातील त्याच्या लोकप्रियतेचा लाभ घेण्यासाठी आणि समाजावरील आपले वर्चस्व टिकविण्यासाठी त्याच्या नावाचा दुरुपयोग करतात. अशा प्रकारचे विविध विचारव्यूह आपल्या आजूबाजूला असताना आणि काही जण माझ्या या विषयावरील भूमिकेविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत असताना, रामाविषयी माझी नेमकी भूमिका कोणती, हे सुस्पष्ट करण्याची गरज आहे, असे वाटल्यामुळे मी हे लेखन आपल्या हाती देत आहे. मी येथे समग्र रामचरित्राचे विवेचन करू इच्छीत नाही. मी येथे फक्त दोन मुद्द्यांपुरते स्वतःला मर्यादित करून घेत आहे. रामाने केलेली तथाकथित शंबूकहत्या आणि तथाकथित सीतात्याग ही रामावर टीका करण्यामागची सर्वाधिक महत्त्वाची दोन कारणे आहेत. त्यांची ऐतिहासिकता किती खरी आणि किती खोटी, याविषयीचे विवेचन मी पुढे करणार आहेच. येथे मी इतकेच नोंदवतो, की रामाविषयीची माझी भूमिका मी कधी लपवून ठेवलेली नाही. सातारा जिल्ह्यातील वाई येथून प्रकाशित होणाऱ्या `नवभारत` या मासिकात इ.स. १९७४ मध्ये मी शंबूकाविषयी लेख लिहिला होता. किमान तेव्हापासून मी रामाविषयीची माझी ती भूमिका लिखित स्वरूपात लोकांपुढे वारंवार मांडत आलो आहे. आज पूर्वीची भूमिका बदलून मी काही नवे मांडत आहे, असे मुळीच नाही.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शंबूकहत्या आणि सीतात्याग प्रक्षिप्त