महात्मा गांधीजीच्या विचारांचा एक अभ्यासक म्हणून माझे आणि जगातील अनेक अभ्यासकांचे ठाम मत आहे की, जोपर्यंत देशात आणि संपूर्ण जगात सर्व सामन्यांचे प्रश्न आहेत, विभिन्न स्वरुपाची विषमता आणि शोषण आहे, तोपर्यंत म. गांधीजीचे विचार प्रासंगिक आहेत. आज आपण आधुनिक आणि विकासाचा विशिष्ट टप्पा पार केला आहे. परंतु तरीही समाजातील समस्यांनी अतिशय उग्र स्वरुप धारण केले आहे. आपले सार्वजनिक जीवन अधिक असुरक्षित-हिंसाचारी बनले आहे. देशाने स्वातंत्र्य प्राप्त केले असले तरी खऱ्या अर्थाने सुराज्यापासून आपण आजही खूप दर आहोत. खऱ्या सुराज्याचा मंत्र म. गांधीजींनी हिंद स्वराज्य, रचनात्मक कार्यक्रम आणि इतर पुस्तकांतून दिला. रचनात्मक कार्यक्रमातून म. गांधीजींनी जो अठरा कलमी कार्यक्रम दिला आहे तो सुराज्याचा कृती कार्यक्रमच ठरतो. अनेक विचारवंतांच्या विचारांचे ते प्रतिबिंबच ठरते. आजच्या अनेक प्रश्नांचे उत्तर आणि योग्य पर्याय म. गांधीजींच्या सामाजिक तत्त्वज्ञानात सापडते. समताधिष्टीत समाज निर्माण करण्याचा तो मार्ग असून प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे.सामाजिक समस्यांचे व्यामिश्र स्वरुप लक्षात घेता म. गांधीजींच्या समग्र आणि व्यापक अठरा कलमी कार्यक्रमाचे पुनः प्रकाशन करणे काळाची गरज वाटते. आशय कायम ठेऊन सोप्या भाषेत हा कार्यक्रम वाचकांपर्यंत आणत आहे. सामाजिक व पक्षीय चळवळीतील कार्यकर्ते, सर्व शाखांचे विद्यार्थी, संशोधक, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे, येणाऱ्या सूचनांचे स्वागत आहे.प्रा. राजा होळकुंदे यांनी समर्पक व अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्याने ह्या पुस्तकास वेगळे महत्त्व आले आहे. हे पुस्तक अचूक व आकर्षक बनविण्यास श्री. होळकुंदे, विवेक घोटाळे, सु.ग.जोशी, राजा बोधे, श्री ज्ञानकुमार आर्य, रतन जगन्नाथ गिरी तसेच सुंदर व आकर्षक छपाई करणारे नर्मदा ऑफसेटचे संचालक श्री प्रकाश बडगुजर व राहुल बडगुजर यांचा मी मनातून ऋणी आहे.
- डॉ. नागोराव कुंभार
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : महात्मा गांधीजींचे सामाजिक तत्त्वज्ञान