शब्दकोशातील `ऑलराउंडर` या शब्दाचा अर्थ प्रत्येक गोष्टीत पारंगत असा होतो. मराठीतील अष्टपैलू या शब्दाचा अर्थ ऑलराउंडरच्या समकक्ष येऊ शकतो. क्रिकेटमध्ये मात्र ऑलराउंडर तोच असतो जो कसोटी सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही पारंगत असतो. मग त्याच्या नावावर मोठे विक्रम नसेनात का पण त्यांच्यात स्वतःच्या बळावर कसोटी सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता किंवा धमक असायला हवी. आज एक दिवसीय क्रिकेटच्या लोकप्रियतेत कसोटी सामन्यांची शास्त्रीयता लुप्त होते आहे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. तरीही खरा, शुद्ध, बावन्नकशी ऑलराउंडर आपली बॅट, आपला चेंडू किंवा फिल्डिंगच्या बळावर सामन्याचा रंगच पालटतो.ज्यांच्यात जन्मजात व नैसर्गिक प्रतिभा आहे, अशा क्रिकेट क्षेत्रातील, साऱ्या जगातील सोळा खेळाडूंच्या कामगिरीची व व्यक्तिमत्त्वाची ओळख या पुस्तकात करून देण्यात आली आहे. यात कीथ मिलर, गारफिल्ड सोबर्स, रिचर्ड हेडली, जॅक्स कॅलिस यांच्याबरोबर भारतातील तीन महान खेळाडू कपिल देव, विनू मंकड आणि सलीम दुराणी यांचा समावेश केला आहे. या सर्वच ऑलराउंडर्सनी किती संघर्ष करत, दुखापती व जखमांशी झुंजत, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आपले उद्दिष्ट गाठले, हे पुस्तक वाचून लक्षात येते. मोठेमोठे विक्रम असलेल्या शेकडो खेळाडूंमधून याच सोळा खेळाडूंची निवड करण्यामागचे कारण प्रत्येक प्रकरणातून उलगडत जाते.पुस्तकाचे लेखक सूर्यप्रकाश चतुर्वेदी इंग्रजीचे प्राध्यापक असले तरी क्रिकेटसारख्या परदेशी खेळाविषयी हिंदीत त्यांनी विपुल लेखन केले आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातून क्रिकेटविषयी लेखन करण्याबरोबरच रेडिओ, दूरदर्शन व यू. जी. सी. च्या कार्यक्रमांसाठी उद्घोषक म्हणून ते काम करतात. `आझाद में भारत क्रिकेट` आणि `विश्व क्रिकेट और भारत` ही प्रो. चतुर्वेदींची नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेली इतर पुस्तके. `सी. के. नायडू, स्पिन गेंदबाजी`, `हमारे आज के क्रिकेट सितारे`, `मुश्ताक अली ही त्यांची गाजलेली पुस्तके.
- मलपृष्टावरून
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : काही महान ऑलराउडर्स