भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय अशा अनेक नावांनी मराठी संतपरंपरा विचारात घेतली जाते. संप्रदाय म्हणत असताना एक प्रकारचे सनातनत्व गृहीत धरले जाते. नको असणाऱ्या परंपरांचे नको तेवढे उदात्तीकरण हाही त्याचाच एक भाग असतो. भक्ती संप्रदायातील वाङ्मयाची चिकित्सा करताना परंपरांचे उदात्तीकरण अल्प प्रमाणात सापडते. त्यामुळे या साहित्याचा सामाजिक सांस्कृतिक अनुबंध प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागतो. परिस्थितीशरणतेपेक्षाही संतसाहित्याने वारकरी समाजाला टिकून राहण्याची जी शिकवण दिली, तीच मराठी कृषिजन परंपरेला आजतागायत पोषक ठरली आहे. तुकोबांच्या अभंगातून जे सामाजिक-सांस्कृतिक विद्रोहाचे रूप दिसते, त्याचे स्थायित्व आजही आबाधितच नाही तर जागतिकीकरणातील विरूपालाही वळण लावणारे आहे. संत बहिणाबाई, जनाबाई, बहिणाबाई चौधरी हे स्त्री-विद्रोहाचे रूपही भक्तिपरंपरेतीलच आहे. जाधवांनी या जाणिवेचा प्रदीर्घ आलेख कृषिकेंद्री जाणिवेतून आपल्या लेखनात मांडला आहे. तो विशेष महत्त्वाचा आहे. आधुनिक काळात सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, प्रार्थना समाज, आंबेडकरी चळवळीवरही संतसाहित्यातील कृषिकेंद्री आणि बहुजन जाणिवेचा प्रभाव पडलेला आहे, हे स्वीकारावेच लागेल….(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संत परंपरा आणि कृषिसंस्कृती