प्रसाद अंतरवेलीकर हे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त `लोकशाहीर`. त्यांनी जगलेल्या तमाशाचं अंतरंग उलगडून दाखविणारा, `तमाशा`चा तमाशा` हा त्यांचा छोटेखानी ग्रंथ. शा. अंतरवेलीकरांनी शाळकरी वयापासूनच गायन आणि अभिनयाचा छंद जोपासला. कळत्या वयात स्वतःचे `किसान कलापथक` निर्माण केले. नाशिक जिल्ह्यातील ओझर मिग येथील `लोकरंजन कलापथकात`, त्यांच्यातील चतुरस्त्र कलावंताला मोकळे अवकाश प्राप्त झाले. भावगीत, लोकगीत, लावणी, पोवाडा, लोकनाट्य, नाटक, मराठी चित्रपट पटकथा, संवाद गीते या कलाप्रकारांचे त्यांनी प्रभावीपणे लेखन केले. स्वतःच्या ग्रामीण तमाशाची व कव्वाल पार्टी आणि भीम जलसाचीही त्यांनी निर्मिती केली. अभिनय आणि गाता गळा त्यांना जणू उपजतच लाभलेला. शेतीमातीतून सवड काढून लोककलेतील विविधांगी कलाप्रकार सादर करणारा हा चौरंगीचिरा, म्हणूनच लक्षवेधी. `तमाशा`चा तमाशा` या त्यांच्या ग्रंथात त्यांनी कला क्षेत्रातील स्वानुभव कथन केलेले आहेत. तमासगीरांच्या अवगुणांमुळे तमाशाक्षेत्र बदनाम झाल्याचे त्यांनी नीर्भीडपणे नमुद केले आहे. एकेकाळी रंजनप्रधान व लोकजागृतीसाठी महत्वपूर्ण असलेला `तमाशा` आता लोप पावतो आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण मराठी तमाशा संदर्भातील अनुभवसिद्ध असे हे पुस्तक, वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा मला विश्वास वाटतो.
- प्रा. गंगाधर अहिरे, नाशिक
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : तमाशा चा तमाशा