ग़ज़ल या काव्यप्रकाराचा प्रदीर्घ प्रवास झालाय. त्यातील अपूर्णत्व, गुणावगुणाची चर्चा, त्यावर आक्षेप व त्यांचे खंडनमंडन हे अमीर खुसरोच्या, वली दखनीच्या काळापासून चालत आले आहे. पण अनेक शतके फारसी-उर्दू कवी ग़ज़ला लिहितच आहेत. उत्तरोत्तर ग़ज़ल हा काव्यप्रकार समग्र भारतीय भाषांत हळूहळू साकारतो आहे. मराठीत ग़ज़ल हा काव्यप्रकार आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धन उर्फ `माधव जूलियन` ह्यांना, तर ग़ज़ल मराठीत रुजविण्याचे श्रेय सुरेश भटांना द्यावे लागेल. पन्नास वर्षांची मराठी ग़ज़ल नुकतीच कुठे किशोरावस्थेत आहे. या काळात एक काव्यप्रकार म्हणून तिला रसग्रहणात्मक प्रोत्साहन देणे उचितच ठरेल. कविता आणि ग़ज़ल एकमेकांहून रूपाने आणि शैलीने विलग असल्या तरी दोन्ही आहेत पद्मच, तेव्हा त्याच विभागात गजलचा अभ्यास उचित ठरतो. मराठी ग़ज़लेच्या एकूण पन्नास वर्षांचा आलेख स्पष्ट करणाऱ्या मंगेश पाडगावकर ते अमित वाघ अशा एक्केचाळीस ग़ज़लकारांच्या गजला या संग्रहात एकत्रित केलेल्या आहेत. मराठी ग़ज़ल : अर्धशतकाचा प्रवास चे संपादक राम पंडित हे उर्दू आणि मराठी साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, समीक्षक आणि अनुवादक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदेमध्ये ग़ज़लिका, ऋतुरंग, रंग उडून गेले, षोडस श्रावण या त्यांच्या ग़ज़ल-काव्यसंग्रहांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मराठी ग़ज़ल: अर्धशतकाचा प्रवास