शापित अप्सरा` ही कादंबरी म्हणजे एक फॅण्टसीच म्हणता येईल. एक शापित अप्सरा दगडी मूर्ती होऊन जंगलात लाखो वर्षे पडून होती. एका चित्रकाराचे तिच्याकडे लक्ष जाऊन तो तिला चित्रबद्ध करतो आणि ते चित्र एका प्रदर्शनात मांडतो. सर्वजण त्या चित्रातल्या युवतीचे सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होतात. स्तुती करून ते चित्र विकत मागतात पण चित्रकार ते विकत नाही. कारण चित्रालाही भावना असतात. हा विचार वेगळा वाटतो. नंतर ती अप्सरा जिवंत होऊन जणू तिची कर्मकहाणी सांगू लागते. इथूनच जाधवांची कादंबरी सुरू होते. अनेक गोष्टींचा उलगडा करत कादंबरी हळूहळू पुढे सरकते. पण पूर्ण कादंबरीत ग्रह-नक्षत्रे, सैतान, देव, दानव युद्ध, टिनू- शीलाचा पराक्रम, देवींचे त्यांना आशीर्वाद हे सर्व योग्य पद्धतीने मांडण्यात आले आहे. शेवटी मानवाने जप, तप, होम, हवन हेच दैवी मार्ग पत्करावेत, त्यानेच मानवाचे कल्याण होईल व संकटे निवारली जातील अन्यथा सैतानाचे राज्य स्थापित होईल. अशा तहेचा संदेश लेखकाने दिला आहे. आजदेखील आपण आगडोंब, धरणीकंप, त्सुनामी, ज्वालामुखी यांसारख्या घटनांचा अनुभव घेतच आहोत. त्यामुळे कादंबरीतील वर्णने वास्तववादी वाटतात. सर्वांवर मात करण्यासाठी देवाचा मार्ग अवलंबा, असा सल्ला जाधवांनी या कादंबरीतून दिला आहे. वाचक उत्सुकतेपोटी कादंबरीत अधिकाधिक गुंतत जाईल, अशी लेखनशैली प्रकाश जाधव यांची असून हे या कादंबरीचे खास वैशिष्ट्यच मानावे लागेल.
- सौ. माधुरी अ. वैद्य
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शापित अप्सरा