`धडपड` या माझ्या आत्मकथनाची ही दुसरी आवृत्ती आपल्या सेवेत येत आहे. मार्केटिंगच्या या जगात ५००० पुस्तके हातोहात संपली. तीही कुठलीही जाहिरात न करता संपणे, हे आश्चर्य या पुस्तकाने अनुभवले. या पुस्तकाने काहींना रडवले मात्र अनेकांनी हे पुस्तक एक `लढाईसाठीचे टॉनिक` म्हणून स्वीकारले, याचा मला खूप आनंद झाला. मा. प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी रात्री दहा वाजता पुस्तक मिळताच रात्रीच वाचून संपविले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्र्यंबकेश्वरच्या सभेत त्यांचे डोळे पाणावले. त्या भाषण करताना अचानक थांबून `डॉ. आंबेडकरी चळवळीपुढे मी नतमस्तक होते` असे म्हणाल्या, याचा मला सार्थ अभिमान वाटला. हे पुस्तक अनेकांनी आपल्या जवळच्यांना भेट म्हणून दिले. दहावीच्या तोंडी परीक्षेत एका मुलीने `सर्वात आवडते पुस्तक` म्हणून शिक्षकाला सांगितले व त्यातील उतारे वाचुन दाखविले. अनेकांना यातील छोटी वाक्ये व सत्यकथा, साधी विनाअलंकारिक भाषा आपली वाटली. माझ्या अनेक मार्गदर्शकांनी `धडपड`च्या पुढचा भाग कधी येतो आहे? असे विचारले. खरे तर मी एम्.एस्. (ऑर्थो) होईपर्यंत आर्थिक परिस्थितीने नागावलेला होतो. आता मी आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. मी अर्धपोटी व अर्धनग्न माणसाला गरीब मानतो. भारतात असे सत्तर टक्के लोक आहेत. त्यांना आपण काही देवू शकत नाहीत, याचे दुःख वाटते. ही दुसरी आवृत्ती मी त्यांनाच अर्पण करतो. भारत महागाईने होरपळत असताना प्रसारमाध्यमे लष्करप्रमुखांच्या जन्म तारखेचा प्रश्न ठळकपणे दाखवतात, हे भूकेल्यांकडे बघून वाकुल्या दाखविण्यासारखेच आहे. ते थांबावे व लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी प्रसिध्दीमाध्यमे काम करतील, मी अशी आशा या निमित्ताने बाळगतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : धडपड सालदाराच्या पोराची...