दि. बा. पाटील दीर्घकाळ कथालेखन करत आहेत. दक्षिण महाराष्ट्रातल्या साहित्य चळवळीचे नेतृत्व त्यांनी खंबीरपणे केले आहे. नव्या लिहिणाऱ्यांना दि. बा. हे सतत आधार वाटत आलेले आहेत. रांगडी भाषा आणि धीरगंभीर आवाजाचा त्यांनी स्वत:चा असा एक धाक निर्माण केला आहे. समाजातील हरलेल्या माणसांची लढाई ते आजवर लढत आलेले आहेत. कथेतला प्रदेश हा कृष्णाकाठचा आहे. तिथली माणसं, त्यांचं दुःख, त्यांची अवहेलना दि.बां.च्या कथेत वावरताना दिसते. त्यामुळेच त्यांची कथा ताजी आणि आजच्या भोवतालाला प्रतिक्रिया देणारी आहे. लेखक म्हणून समाजात वावरताना, सुखदुःखात सामील होताना जे प्रश्न पडतात ते त्यांनी आपल्या कथेत मांडलेले आहेत. आजचे लोकमानस त्यांची कथा अचूकपणे पकडते. त्यांच्या कथेत सामान्य माणसाविषयीचा जिव्हाळा ओतप्रोत भरलेला असून माणसांचा स्वभावशोध ते थेटपणे घेतात. हे त्यांच्या कथेचे वेगळेपण आहे. नोटबंदीतील प्रत्येक कथा वेगळ्या धाटणीची आणि कथेच्या नव्या शक्यता शोधणारी आहे. आजचे वर्तमान चिमटीत पकडणाऱ्या या कथा वाचकाला गुंतवून ठेवतात. या आगळ्या वेगळ्या कथांचे स्वागत वाचक निश्चितच करतील.
(मलपृष्ठावरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : नोटबंदी