किल्ले हे `राकट कणखर` अशा `महाराष्ट्र देशा` चे वैभव आहे. `संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग` या `आज्ञापत्रा` तील एका विधानात मध्ययुगीन दुर्गमाहात्म्य प्रकट झाले आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला `शिवनेरी` किल्ला हे असंख्य इतिहासप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान बनलेले आहे. डॉ. लहू गायकवाड यांनी त्याचा इतिहास `शिवनेरीची जीवनगाथा` या ग्रंथाच्या रूपाने उलगडून दाखवला आहे. किल्ल्यांविषयी भरभरून लिहिणारे हौशी लेखक खूप असतात. सामान्य वाचकांना, विशेषतः गडभ्रमण करणाऱ्यांना त्यांच्या लेखनाचा उपयोगसुध्दा होतो. डॉ. लहू गायकवाड यांनी मात्र केवळ इतिहासाचा छंद जोपासणारे लेखन केलेले नाही. दुर्गजिज्ञासेला संशोधकीय रूप देऊन त्यांनी प्रस्तुत ग्रंथ सिध्द केलेला आहे. हा ग्रंथ केवळ शिवकालापुरता मर्यादित नाही. अतिप्राचीन अवशेष, सातवाहनकालीन लेणी व शिलालेख यांपासून वर्तमान पर्यटनयुगापर्यंतच्या मोठ्या पटावर शिवनेरीची ही जीवनगाथा चित्रित करण्यात आलेली आहे. हौशी, काल्पनिक, भावूक अशा मांडणीला फाटा देऊन प्राथमिक व दुय्यम साधनांच्या भक्कम आधारावर हा संशोधनपर ग्रंथ साकार झालेला आहे. `शिवनेरी` वरचा असा हा पहिलाच ग्रंथ आहे. सामान्य वाचक, पर्यटक आणि अभ्यासक या सर्वांनाच तो उपयुक्त ठरेल आणि मराठीतील दुर्गसाहित्यात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शिवनेरीची जीवनगाथा