भाषाव्यवहार आणि सामाजिक संरचना यांत परस्परावलंबित्वाचे नाते आहे. लौकिक जीवनात भाषेचा उपयोग व्याकरणिक नियमांनी होत नसून सामाजिक संकेतांनी होत असतो. त्यामुळे भाषेचा अभ्यास हा एका अर्थाने समाजाचाच अभ्यास असतो. समाजभाषाविज्ञानाची ही नवी दिशा भाषेच्या पारंपरिक अध्ययनाला छेद देणारी आहे.
समाजभाषाविज्ञानात भाषा आणि सामाजिक व्यवहार यांतील आंतरसंबंधांचा अभ्यास केला जातो. उच्च-मध्यम- कनिष्ठ वर्गीय, स्त्री, पुरुष, ग्रामीण, दलित, आदिवासी, विविध धंदे व व्यावसायिक, जित-जेते या सर्वांच्या भाषाव्यवहाराची सामाजिक बाजू लक्षात घेऊन अभ्यास केला जातो. तसेच भाषा आणि शिक्षण, भाषा आणि राजकरण, भाषा आणि सामाजिक जडण घडण, भाषा आणि साहित्य इत्यादी अनेकविध अंगांनी भाषेच्या कार्याचा वेध घेतला जातो. भाषावार प्रांतरचनेने निर्माण केलेले प्रश्न, भाषिक अल्पसंख्यांकांचा दबावगट, एक राष्ट्र-एक भाषा एक लिपी चे प्रश्न, शासन व्यवहाराची भाषा, शिक्षणाचे माध्यम इत्यादी अनेक भाषिक प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करणारी ही अभ्यास शाखा आहे..
प्रस्तुत पुस्तकात सामाजिक भाषाविज्ञानातील एडवर्ड सपिर, वोर्फ, मॅलिनोवस्की, फर्थ, बर्नस्टीन, लेबॉब इत्यादी अभ्यासकांच्या सिद्धांतांचा परिचय करून देण्यात आला आहे. भारतीय भाषिक संदर्भाचे दाखले देऊन या संकल्पनांचा परिचय करून देण्याची लेखकाची भूमिका असल्यामुळे या क्षेत्रातील नवअभ्यासकांना हे पुस्तक पथदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : समाजभाषाविज्ञान प्रमुख संकल्पना