इ.स. १६३० ते इ.स. १८१८ हा मराठा राज्याचा कालखंड आहे. इसवी सनाच्या सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचे मोगल आणि विजापुरची आदिलशाही या मुस्लिम सत्तांशी प्रदीर्घ लढा देऊन महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. हे स्वराज्य मराठा राज्य म्हणून प्रसिध्दिस आले. मराठा राज्याच्या कालखंडाचे विभाजन शिवकाळ (इ.स. १६३० इ.स. १७०७) आणि पेशवेकाळ (इ.स. १७१३ इ.स.१८१८) अशा दोन कालखंडात करण्यात येते. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी तिसरे यांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी तिसरे हे अल्पवयीन असल्याने त्यांचे पालक म्हणून महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू (शिवाजी दुसरे) यांची इ.स. १७०७ मध्ये मोगलांच्या कैदेतुन सुटका झाली आणि ते महाराष्ट्रात आले. त्यांच्या महाराष्ट्रातील आगमणामुळे मराठा राज्याच्या राजकारण व इतिहासाला वेगळेच वळण मिळाले. मुळात शाहू हेच मराठा राज्याचे वारस होते, परंतु मोगलांनी इ.स. १६८९ मध्ये त्यांना कैद केल्यामुळे मराठा राज्याच्या छत्रपती पदापासून त्यांना दूर राहावे लागले. शाहूंनी आपली सुटका होताच महाराणी ताराबाईकडे राज्याची मागणी केली, पण महाराणी ताराबाईने त्यांना विरोध केला. शेवटी इ.स. १७०८ मध्ये त्यांच्यात खेड या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांना विजय मिळाला आणि ते मराठा राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शाहू महाराजांच्याच कारकिर्दीत पेशव्यांचा उद्य झाला आणि तेच राज्यकर्ते बनले. बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, बाळाजी बाजीराव, थोरले माधवराव, नारायणराव, रघुनाथराव, सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव हे पेशवे काळात पेशवे होऊन गेले. या पेशव्यांनी मराठा राज्याचा चौफेर विस्तार केला. परंतु हे मराठा राज्य इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी जिंकून घेतले व या राज्याचा शेवट झाला. मराठा राज्याची राजधानी शिवकाळात रायगड आणि पेशवे काळात पुणे होती. प्रस्तुत ग्रंथात मराठाकाळातील महाराष्ट्रातील समाज, गुन्हे, दंड आणि शिक्षा यांचा अभ्यास केला आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मराठेकालीन समाज,गुन्हे,दंड,आणि शिक्षा