रामराजे आत्राम हे आदिवासी भटक्या-विमुक्त समाजातील सक्रिय कार्यकर्ते आहेत. ह्या समाजातील जगण्याच्या जीवघेण्या तडफडीचं निर्मूलन व्हावं आणि या समाजाला मानवी प्रतिष्ठेचं जिणं मिळावं अशी करुणामय अभिलाषा बाळगणारे ते लेखक आहेत. हा समाज आत्रामांच्या अंतःकरणात रुंजी घालतं. आदिवासी भटक्या विमुक्तांच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या परंपरांना आत्रामांचा कठोर विरोध आहे. म्हणूनच त्यांच्या विदीर्ण आयुष्याची परिक्रमा लेखकाला अस्वस्थतेच्या गुहेत नेते. त्यांच्या छिन्न-विछीन्न आयुष्याची लक्तरे लेखकाला हाकारत येतात. `मसनवटा` पुस्तकातील त्यांचं अनुभवविश्व आपल्या जीवनानुभवावर जेव्हा आदळतं तेव्हा आपणही भेदरुन जायला लागतो. हे अनुभवविश्व प्रत्यक्ष जगण्यातून आलेलं असल्यामुळं त्यांच्या अस्सलतेमुळे आपण अंतर्मुख होतो. भटक्या विमुक्त-आदिवासी समाज जरी उपेक्षित असला तरी तो गावगाड्यातील दलितांपेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचा वृथा अभिमान बाळगतो. दलित आणि पददलितांमधील अंतर्विरोध रामराजे आत्राम मोठ्या प्रत्यकारितेने आपल्यासमोर ठेवतात. पारधी समाजातील बाई विकली जाते हा अनुभव तर आपल्या अंगावर रोमांच उभे करतो ह्या पुस्तकातील लेखन म्हटले तर कथात्म लेखन आहे, म्हटले तर स्वकथनही आहे. भटक्या विमुक्तांच्या उत्थानाच्या नैष्ठिकतेचे प्रत्यंतर देणारे हे अनुभवविश्व आहे. म्हणूनच ह्या लेखनाला समकालीन ऐतिहासिकतेचे परिणाम प्राप्त झालेले आहे. अनुभवाची भेदकता आणि करुणेची कवचकुंडले हा ह्या लेखनाचा विशेष आहे. चळवळीच्या गतिशिलतेची साक्ष देणारे हे पुस्तक आहे. रामराजे आत्राम यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अविचल श्रद्धा आहे. ह्या विचारव्युहातूनच ते आदीवासी आणि भटक्या विमुक्तांच्या जीवनाचा वेध घेतात हे त्यांच्या जीवनदृष्टीचे ठळक वैशिष्ट्ये आहे. संस्कृतीने नाकारलेल्या उपेक्षित समाजाचे अंतरंग समजून घेण्यासाठी रामराजे आत्राम यांचा हा प्रयत्न निश्चितच उपकारक ठरेल, असा महाविश्वास वाटतो.
- डॉ. ऋषीकेश कांबळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मसणवटा