७ जुलै १९९४ रोजी मी आमच्या महाविद्यालयाच्या सेवेत रुजू झालो. दि. १७ जून १९९४ च्या मुलाखतीच्या पत्रानुसार बुधवार, दि. २९ जून १९९४ रोजी माझी मुलाखत झाली होती. बुधवार, दि. ५ जुलै १९९४ रोजी मराठी विषयाच्या ‘अधिव्याख्याता पदावर निवड झाल्याची तार तत्कालीन प्राचार्य डॉ. स. भी. खरोसेकर यांनी श्रीराम यशवंत गडकर, खोली क्र. ३६, वसतिगृह क्र. ५, पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७. (१९९३-९४ या शैक्षणिक वर्षात मी एम. फिल. करत होतो) या पत्त्यावर पाठवली होती. या सुंदर प्रवासाला... ७ जुलै २०१९ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. २०१८ - १९ या शैक्षणिक वर्षात माझं महाविद्यालय रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे. माझ्याही सेवेचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. या २५ वर्षांचा मराठी विभागाचा, माझे सहकारी प्रा. डॉ. आनंदा गांगुर्डे यांचा व माझा - शैक्षणिक उपक्रम, अभ्यासपूरक उपक्रम, अभ्यासेतर उपक्रम, इ. बाबींचा आढावा या स्तंभात्मक दैनंदिनी मध्ये घेतला आहे. यामध्ये सर्वच बाबींच्या नोंदी येऊ शकल्या नाहीत. ज्या बाबींची नोंद मी त्या त्या वेळी केली नाही याचे मला आज मागे वळून पाहताना वाईट वाटते. या साहित्यकृतीची पुढील आवृत्ती प्रकाशित होताना निसटून गेलेल्या काही नोंदी अद्ययावत करण्याचा माझा मानस आहे. स्तंभात्मक दैनंदिनी हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग एक सांस्कृतिक दस्तावेज ठरेल व वाचकांना आवडेल असा मला विश्वास आहे….(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सुंदर प्रवास …