गुलामी जीणं
(कथासंग्रह)
प्रस्तावना
श्री. रमेश जावीर हे प्रवृत्तीने कलावंत आणि व्यावसायाने शिक्षक आहेत. कलांवत आणि शिक्षक या दोन्ही प्रतिमा परस्परपूरक असल्या तरी सर्वच शिक्षक कलावंत असतात असे नव्हे. श्री. जावीर काष्टशिल्पप्रेमी आहेत. चित्रकला, शिल्पकला, मुर्तीकला हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला अभिनव असा गुण आहे. त्यांचे हे गुणवैशिष्ठ्ये त्यांच्या शिक्षकी पेशात उतरले त्याचा उपयोग त्यांनी घडविलेल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये पासरले. शिक्षक आणि समाज हे नाते यापेक्षा वेगळे काय असते ? आपला भोवताल विचारी करावा, तो अभिरुचीसंपन्न व्हावा ही अपेक्षा शिक्षकाच्या मनात असणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. रमेश जावीर ही सुंदरता जगले हे महत्वाचे आहे. स्वत:ला अभिव्यक्त करणं आणि त्या अभिव्यक्तीचा सुगंध भोवतालात दरवलं ही गोष्ट अनेकार्थाने प्रसन्न आहे. या अर्थाने रमेश जावीर यांचे व्यक्तिमत अष्ठपैलू आहे. जावीर हे जेवढे मोठे कलावंत आहेत तेवढेच मोठे ते लेखक आहेत.
लेखकाची बांधिलकी काय असते याचे प्रत्यंतर जावीर यांचे लेखन वाचून येते. आपण ज्या समाजगटात जन्मलो त्या समाजाच्या सांस्कृठिक उन्नतीबद्दल भानं असणं हे लेखकाच्या बांधिलकीन अंगभूत आहे.
रमेश जावीर ज्या जातसमूहात जन्मले तो होलार समाज. गावगाड्यातली हलकी कामे या समाजाच्या वाट्याला आलेली. बाधकाम करणे, विशेषत: यात्रा, उत्सव आणि लग्नकार्यात वाजंत्रीकाम करण्यात हा समाज दिसतो. हे असं वाजवायचं काम महार, मांग समाजासोबत होलार समाजाच्याही माथी कुणी मारलं? तर व्यवस्थेने चार्तुवर्ण्य व्यवस्थेने समाजातल्या खालच्या वर्गाच्या माथी वरच्या वर्गाची सेवा, चाकरी किंवा मनोरंजन करण्याची जी परंपरागत सक्ती लाधली त्या व्यवस्थेतून ही चाकरी जन्माला आली. मनुस्मृर्ती आणि तस्सम धर्मग्रंथांनी या चाकरीला जन्म दिला आणि गुलामी पिढ्यानं पिढ्या प्रवाहित ठेवली. खरे तर याला रमेश जावीर इहलोकीचे गुलाम म्हणतात हे अगदी खरे आहे.
या कथासंग्रहात 'इहलोकीचे गुलाम ही एक महत्वाची कथा आहे. खरे तर ही कथा व्यवस्थेलाच प्रतिप्रश्न आहे. तमाम उपेक्षित, दलित आणि भटक्या समाजाच्या माथी हे सक्तीचं सांस्कृतिक दारिद्रय लाधणाऱ्या मनूवादी व्यवस्थेला तो प्रतिप्रश्न आहे. हा प्रतिप्रश्न बुद्धांपासून तर फुले-शाहू -आंबेडकर यांनी विचारला आहे.
श्री. रमेश जावीर हे प्रागतिक विचारांची परंपरा ललित साहित्याच्या रुपाने पूढे नेऊ पहात आहे. खरे तर हीच त्यांची बांधिलकी आहे. ते त्यांच्या लेखनाशी जेवढे प्रामाणिक आहेत तेवढेच ते या प्रागतिक विचाराच्या परंपरेशीही प्रामाणिक आहेत. सांस्कृतिक, सामाजिक गुलामी नाकारण्याचे हे त्यांचे सर्जनशिल पाऊल आहे.
श्री. रमेश जावीर यांच्या ‘गुलामी जीणं’ या कथासंग्रहात त्यांचा स्वानुभाव काठोकाठ भरलेला आहे. एक कलावंत, शिक्षक आणि संवेदनशील लेखक म्हणून श्री. जावीर यांना त्यांच्या भोवतालात जे अनुभव आले त्याचे चित्रण म्हणजे हा कथासंग्रह आहे. खरं तर या कथासंग्रहाचे पहिले शीर्षक 'इहलोकीचा गुलाम' असे होते. या संग्रहाची ई-आवृती काढताना त्यांनी अत्यंत विचारपूर्वक हे शीर्षक बदलले. हा बदल केवळ शीर्षकापुरता मर्यादित नाही तर तो काळानुसार लेखकाच्या विचारविश्वात झालेला बदल आहे असे मला वाटते. इहलोक ही अदृष्य कल्पना आहे. जी वैदिक परंपरेने धर्मग्रथांच्या मार्फत बहुजन समाजाच्या माथी मारली आहे. ही कल्पना आणि त्यामागचे वास्तव समजून घ्यायला खूप वेळ गेला आहे. महात्मा फुले यांच्यापासून ते डॉ. आंबेडकर यांच्यापर्यंतच्या महापुरुषांना यासाठी किती परिश्रम करावे लागले याची कल्पना सर्वांनाच आहे. परंतू काहीका असेना माणूस बदलतो आहे. त्याचा विचार बदलतो आहे. श्री. रमेश जावीर माणसाला बदलू पहाणाऱ्या या पुरोगामी परंपरेतले लेखक आहेत. आपला गाव, गावातली माणसं, त्यांची संस्कृती आणि संस्कृतीनं उभ्या केलेल्या परंपरा बदलाव्यात, त्यात नवतेचे, विज्ञानांचे वारे वाहू द्यावे असे जे जावीरांना वाटते ते महत्वाचे आहे.
श्री. जावीर यांचा हा कथासंग्रह जवळ जवळ सतरा कथांनी व्यापलेला आहे. 'शिवारधन', 'अब्रु' ‘मुक्या वेदना’, ‘मजबूरी’ अशा सकस कथा या संग्रहात आहेत. अब्रु ही दलितांवरील होणारे अन्याय, अत्याचार दर्शवणारी कथा आहे. फटकरी ही कथा ऊसतोड कामगारांचे जीवन व्यक्त करते. शेवटी तो गेलाच ही कथा एड्स रोगाने ग्रस्त व्यक्तीचे जीवन चित्रीत करते. सासरची वाट ही कथा नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाचे बायकोच्या जीवनावर झालेले दुष्परिणाम दर्शवते. पारूचा मुका ही कथा मुकबधीर व्यक्तीचे जीवन व्यक्त करते. माणसं गावापासून तुटली की ती आपल्याच आदिबंधाला कशी विसरतात याचे उत्तम उदाहरण सांगणारी 'शिवारधन' ही पहिलीच कथा वाचकांना विचार करायला लावते. शिक्षकीपेशा सांभाळताना आपल्या अनुभवविश्वात दिसणाऱ्या गोष्टी मांडत मांडत जावीर काही प्रश्न उभे करतात. खरे तर या संग्रहातील प्रत्येक कथेत जावीरांनी जे जे प्रश्न उभे केलेत ते मला खूप महत्वाचे वाटतात. 'शिवारधन' या पहिल्याच कथेत गाव आणि शहर यांतली तुटलेली सांस्कृतिक नाळ लेखक अधोरेखित करतात. शहरात विसावलेल्या आणि मातीला विसरलेल्या विनायकला शेतात उगवलेली पिके ओळखता येत नाहीत. निसर्गाच्या कुशीत विहारणाऱ्या पक्षांना आणि प्राण्यांना समजून घेता येत नाही. ज्या मातीत त्याचा जन्म झाला त्याच मातीच्या गंधाला तो पोरका झाला. हा सगळा जगण्यातला विरोधाभास माणसाच्या पदरी कुणी टाकला असा अनामिक सवाल विचारत ही कथा पूढे जाते आणि माणसाच्या आतल्या आणि बाहेरच्या तूटलेपणाला सांधण्याचा ती प्रयत्न करते.
शेतकरी साहित्य इर्जिक परिषद व संजिवनी फार्मच्या वतीने आयोजित साहित्यिक संवादात लेखक सहभागी होतात. ग्रामीण संस्कृती व ग्रामीण साहित्यासंदर्भात झालेली ही चर्चा जावीर यांनी कथेच्या रुपात ज्या रितीने मांडली आहे त्याला तोड नाही. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेतीचे आणि निसर्गाला कवेत घेऊन नवे नवे प्रयोग करणारी असंख्य माणसे आहेत. त्यांच्यामुळे गावगाड्यात आधुनिकता आली. विचार आला आणि विशेष म्हणजे निसर्गावर आणि शेतीवर प्रेम करणारा इष्टीकोन आला. माणदेशातील वकील हे या कथेतील एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. परंतु अशा प्रयोगशिल माणसांमुळे खूप काही टिकून आहे हे मात्र खरे.
भारतीय लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट घेतले ते अतुलनिय आहेत. संविधानामुळे भारतातल्या दलित, श्रमिक आणि बहुजन समाजाला जो समतेचा मूलमंत्र मिळाला तो लोकशाही हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येकाच्या मताला समान दर्जा देऊन बाबासाहेबांनी मोठे उपकार केले आहेत. अर्थात हे सारे हक्क शिकल्याशिवाय, संघटीत झाल्याशिवाय मिळणार नाहीत हे सत्य आहे. चार्तूवर्ण्य व्यवस्थेने दलितांचे जे हाल केले ते लोकशाही व्यवस्थेत बदलले. दलित शिकले, संघटीत होऊन संघर्ष करू लागले. यातूनच ते सत्तेच्या स्थानावर पोहचले. ‘व्हय मी दलित गरमपंचायतीचा मेंबर बोलतोय’ ही जावीर यांची कथा अनेकार्थाने विचार करायला लावते. दलितांचं सत्तेच्या केंद्रस्थानी येणं ही जातीव्यवस्थेलाच नव्हे तर संपूर्ण धर्मांध सत्तेला सुरुंग लावणारी गोष्ट आहे.
लेखक रमेश जावीर यांच्या लेखनाचे कितीतरी गुण सांगता येतील परंतू आपल्या सामाजिक- सांस्कृतिक भोवतालात जे जे प्रश्न जाणवतात त्यांना मांडण्याचं धाडस जावीर दाखवतात. मग तो प्रश्न गावगाड्यातला असो की हिंदू-मुस्लिम संबंधांचा असो. प्रश्न जातीव्यवस्थेने मागास ठरवलेल्या दलित, भटके किंवा श्रमिकांचा असो की त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या मुजोर व्यवस्थेचा असो. लेखक म्हणून जावीर हे व्यक्त होतात. जाण विचारतात आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात हे महत्वाचे वाटते. ‘त्यांच्या' आगळी वेगळी देवदासी' या कथेची नायीका असो की 'खरे सुख’ मधला मधू असो.
शिक्षकीपेशा सांभाळत एक कलावंत लेखन करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेश जावीर आहेत. त्यांच्या कविता आणि कथा मनोरंजनात्मक नसून त्या प्रबोधनाच्या वळणाच्या आहेत. साधी, सरळ आणि मनोवेधक लेखनशैली हा त्यांचा गुण आहे. आपलं आयुष्य प्रसंगानुरूप कसं मांडता येतं हेही त्यांनी त्यांच्या लेखनातून दाखवून दिले आहे.
लेखकाची त्यांच्या विचारविश्वाशी बांधिलकी कशी असते हे जावीर यांचे लेखन वाचून कळते. लेखनातून समाज सुटला की लेखन वांझोटे होते हे जावीरांना ठाऊक आहे. म्हणून समाज विशेषतः ग्रामीण जीवन, संस्कृती आणि निसर्ग हे त्यांच्या लेखनातून त्यांनी सुटू दिलेले नाही.
श्री. रमेश जावीर यांचा मोठा वाचकवर्ग आहे. त्यांच्या लेखनाचा चाहतावर्ग त्यांनी मोठ्या कष्टाने मिळवला आहे. असा वाचक प्रेम लाभलेला लेखक जेंव्हा जेंव्हा लिहितो, बोलतो तेंव्हा जगभरातला वाचकही त्यांच्याकडे लक्ष देईल अशी आशा या ईबुकद्वारे करायला हरकत नाही. त्यांच्या लेखन वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
- मिलिंद कसबे.
Comments