अंधारातून उजेडाकडे’ हे दोन शब्द वाचायला आणि लिहायला सुंदर वाटत असलं तरी एका शब्दाकडून म्हणजे एका पर्वाकडून दुसऱ्या पर्वापर्यंतचा प्रवास मात्र कठीण, खडतर आणि रक्तबंबाळ करणारा असतो. व्यवस्थेनं नाकारलेल्या दलित समाजातील माणसाला तर तो खूपच कठीण असतो. कधी स्वतःविरुद्ध तर कधी व्यवस्थेविरुद्ध लढावं लागतं... श्वासागणिक लढावं लागतं. हे सारं झालं की, उजेडाचंच गाणं गाणारा आणि उजेडच उधळणारा माणूस तयार होतो. खरं तर तो विजेता असतो. अशा अनेक विजेत्यांपैकी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव एक आहेत. मेलेल्या जनावरांची हाडं गोळा करण्यापासून त्यांचा प्रवास सुरू होतो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यापर्यंत पोहोचतो. बालपणी हमाली, बिगारी करण्यापासून सुरू होणारा प्रवास हजारो विद्यार्थी घडविण्यासाठीच्या वाटेपर्यंत पोहोचतो. जातीयतेचे चटके सहन करत सुरु होणारा हा प्रवास फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चाललेल्या परिवर्तनाच्या प्रवाहापर्यंत पोहोचतो. बाबासाहेबांनी सांगितलेल्या `शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा` या क्रांतिकारी शिकवणीपासून आठवणी करण्यापासून सुरू होणारा हा प्रवास एका कळसापर्यंत पोहोचतो. माणूस बदलतो...त्याचा समाज बदलतो... पण त्यासाठी शिक्षण आणि फक्त शिक्षणच हवं, हे महात्मा फुल्यांचं सूत्र वापरुन रामचंद्र जाधवांनी आपलं आयुष्य प्रकाशमान, यशमान आणि कीर्तिमान बनवलं. या साऱ्या साऱ्या संघर्षाची एक चित्तरकथा, एक प्रेरणादायी यशोगाथा म्हणजे हे आत्मचरित्र आहे. `स्व` चा आणि भोवतालचा परीघ ते सम्यकपणे मांडतं म्हणून थोडंफार वेगळंही आहे.
- उत्तम कांबळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अंधारातून उजेडाकडे