Book Name | परिवर्तनाचा वाटसरू |
---|---|
Author | संपादक: अभय कांता, प्रज्ञा दया पवार |
Publish Date | 04:50 pm, 18-Jul 21 |
Category | Social |
सर्व भारतीयांचा 'डीएनए' सारखाच आहे. त्यामुळे 'भारतात इस्लाम धोक्यात' या भयचक्रात मुस्लिमांनी अडकू नये, हे त्यांचे विधानदेखील फसवे आणि सरधोपट आहे. डीएनए ही पेशी-जैवविज्ञान शाखेशी संबंधित बाब आहे. भागवत डीएनएचा उल्लेख जैवशास्त्रीय परिभाषा म्हणून करताहेत की, ते नवीन सांस्कृतिक परिभाषा घडवू पाहताहेत ते कळायला मार्ग नाही. ते जर जैवविज्ञानाचा आधार घेऊन बोलत असतील तर, पृथ्वीतलावर सध्या अस्तित्वात असलेल्या एकमेव मानव प्रजातीचा, जिचे नाव 'होमो सेपियन्स सेपियन्स' आहे तिचा डीएनए जगभरात सर्वत्र एकसमान आहे! जो भारतीयांचा डीएनए आहे तोच पाकिस्तानी, बांगलादेशी, नेपाळी, सिलोन, नायजर, युगांडा मधील लोकांचादेखील आहे! डीएनएचा आणि एखाद्या देशाच्या नागरिकत्वाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. डीएनए ही जैवविज्ञानाशी संबंधित बाब आहे. धर्म-संस्कृती- देश राष्ट्र-भाषा-वंश-जात ह्या मानवनिर्मित धारणा आहेत. अमुक धर्माचा, अमुक जातीचा, अमुक वंशाचा, अमुक देशाचा, अमुक संस्कृतीचा, अमुक राष्ट्राचा डीएनए 'स्वतंत्र' नसतो. जीनोम आणि डीएनएच्या परिभाषेतच बोलायचे झाले तर संपूर्ण मानव प्रजाती संमिश्र आहे. वैज्ञानिकदृष्ट्या कुणीही कुठल्याही कसोटीवर कुणीही शुद्ध नाही आणि कुणी अशुद्धही नाही. ज्या काळात कोणताही धर्म, देश, राष्ट्र, संस्कृती जन्मालादेखील आलेली नव्हती तेव्हापासून जैविकदृष्ट्या मानवप्रजातीचे सतत सर्वप्रकारचे संमिश्रण होत आलेले आहे. जेव्हा संमिश्रणाची ही प्रक्रिया थांबेन तेव्हा संपूर्ण मानव प्रजाती नष्ट होण्याचा धोकानिर्माण होईल! संमिश्रणाची अखंड प्रक्रिया जारी आहे म्हणूनच तर मानव प्रजाती तग धरून आहे !.….. (संपादकीय)
View & Download