Book Name | ऋतुपर्ण |
---|---|
Author | सुरेंद्र गोगटे |
Publish Date | 06:30 pm, 11-Jul 21 |
Category | Literature |
एकेक क्षेत्राचा विचार केला तर स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात आपण काय केले आणि काय नाही याचा लेखाजोखाच कोरोना या आजाराने मांडला. लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे, 'इंग्रजांकडून त्यांचे शिक्षण आणि सोयीसुविधा पदरात पाडून घेऊ, आपले पदवीधर अधिक उत्तम पद्धतीने राज्यकारभार चालवतील. राजकारणाच्या खेळात काहीच घडले नाही व अयोग्य लोकांच्या हाती सत्ता गेल्याचे परिणाम आपण पहात आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रविचार स्वातंत्र्यानंतर मात्र मागे पडला. आज आपणाकडे असलेल्या बहुतांश आरोग्यसुविधा (हॉस्पिटल्स) वास्तू ही इंग्रजांमुळेच आपणास मिळालेल्या आहेत. त्यानंतर मात्र आरोग्ययंत्रणा उभी करण्यात आपण कमी पडलो हे वास्तव आहे आणि ते स्विकारावेच लागेल. आरक्षणाच्या घोळामुळे आपल्याकडील चांगले, उच्चशिक्षित डॉक्टर परदेशात निघून गेल्यामुळे संपूर्ण देशपातळीवर आपल्याकडे निष्णात डॉक्टरांची वानवा आहे, आरोग्ययंत्रणा व इतर गोष्टींकडे आपण गांभिर्याने लक्ष दिले नाही हे या आजाराने दाखवून दिले.
शिक्षणक्षेत्राची प्रचंड हानी या महामारीने केलेली आहे. शासकीय यंत्रणांवर ताण नको म्हणून परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन परीक्षा असे प्रकार आपण हाताळत आहोत. आधीच कसाबसा शिक्षणाशी जोडला गेलेला ग्रामीण भागातील. वाड्यावस्त्या व पालावरचा तसेच साखर कारखान्यातील शाळांचा विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेला आहे व जात आहे. त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे भविष्यात जड जाणार आहे. परीक्षा रद्द करणे, घेण्याविषयी सातत्याने घोळ निर्माण करणे यामुळे सुद्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर चांगलाच परिणाम होत आहे. गुणी विद्यार्थ्यांना यातून सावरून भविष्यातील शिक्षणाच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे हे आरोग्य सेवेइतकेच जटील आणि महत्त्वाचे काम आहे. भविष्यातील प्रवेशप्रक्रिया कशाप्रकारे राबवणार याविषयी सुस्पष्ट धोरण सरकारने अजूनही घोषित केलेले नाही.…..संपादकीय