सुवर्णा पवार (खंडागळे) यांची हिकमत ही कादंबरी म्हणजे गतकालीन महाराष्ट्रातील खेड्यात वंशपरंपरेने चालत आलेल्या गावगाड्यातील समाजव्यवस्थेचे चित्रण आहे. हा गावगाडा म्हणजे श्रेणीबद्ध उच्चनीचतेवर आधारलेल्या विविध जातींचा एक संघ. या संघातील मानवी संबंध जातीसंस्था तिच्या परंपरेने निर्धारित करीत असते. त्यामुळे अनेकदा कनिष्ठ श्रेणीतील जाती अन्यायाची शिकार बनतात. या जातीत संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य नसते. परंतु व्यक्तिगत जीवनात आपल्या शुद्ध, प्रेमळ आचरणाने आणि विवेकी वर्तनाने ते संत कबीर, चोखामेळा, रविदास,सोयराबाई यांच्याप्रमाणे व्यवस्थेवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे उच्च जातीयांना अंतर्मुख होण्याची संधी मिळते. कनिष्ठ जातीतील व्यक्तींच्या जीवनातील नैतितिक प्रभाव आणि वरिष्ठ जातीतील काही व्यक्तींची अंतर्मुखता हीच गावगाडा हजारो वर्षे टिकून राहण्याचे प्रमुख कारण आहे. या ऐतिहासिक वास्तवाचे सामाजिक संबंधांच्या अंगाने केलेले प्रतिभाशाली चिंतन म्हणजे हिकमत ही नाकिकाप्रधान कादंबरी होय. त्यामुळे तिला एका सामाजिक इतिहासाच्या दस्तावेजाचे रुप प्राप्त झालेले आहे.
या कादंबरीच्या लेखनाच्या निमिताने सुवर्णा पवार यांच्यात सर्जनशील लेखनाची किती सुप्त उर्जा आहे, याचीही कल्पना येते. भविष्यात त्या सुप्त शक्तीचे तिच्या पूर्ण रूपात प्रकटीकरण व्हावे हीच अपेक्षा.
- प्रा. डॉ. रावसाहेब कसबे
ज्येष्ठ विचारवंत