युवराज धसवाडीकर ह्यांनी आजवरच्या दलित कवितेच्या सम्यक परंपरेची उजळणी करत कार्यकर्त्याच्या आवेशाने आणि कवीच्या स्वप्निल उत्कटतेने कविता लिहिल्या आहेत. 'मला मात्र कविता लिहिली की शिवी देऊन मोकळं झाल्यासारखं वाटतं' असं जाहीर करत लिहिलेल्या 'अंधाराशी घनघोर युद्ध' या कविता वाचताना मेंदूवर भयानक ताण येतो आणि मन प्रचंड अस्वस्थ होते. बुद्ध आणि युद्ध अशा दोन तळपत्या चेहऱ्यांची ही धारदार कविता आहे. दलितांची अवहेलना सहन न होऊन लिहिलेल्या ह्या कविता संहार आणि सृजनांशी संवाद साधत साकार झाल्या आहेत.
डोक्यात विजांचे वादळ घेऊन वावरणाऱ्या वणव्यांनाच युवराज धसवाडीकर यांच्या कवितेतील विराट करुणेची प्रचिती येईल. या कवितांचे उदंड स्वागत व्हायला हवे.
शरणकुमार लिंबाळे