भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे चरित्र अद्वितीय आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचेही.
बाबासाहेबांचे हे पहिले चरित्र असण्याची शक्यता असल्याने हे पुस्तक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या पुस्तकाच्या मूळ प्रस्तावनेत प्रा. रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, मार्च १९४६ मध्ये कराची येथे प्रकाशित झालेले तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी लिहिलेले डॉक्टर आंबेडकर हे चरित्र, आंबेडकर चरित्र लेखनाचा प्रारंभबिंदू आहे.
हे पुस्तक अद्वितीय असण्याची आणखीही अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे कराचीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाने हे पुस्तक लिहिले आहे. दुसरे म्हणजे त्या पुस्तकाची छपाई आणि प्रकाशन कराचीमध्येच झाले होते. याचाच अर्थ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताची फाळणी होण्याआधी आणि पाकिस्तानच्या निर्मितीआधी कराचीमध्ये मराठी बोलणाऱ्या माणसांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ही संख्या मोठी म्हणजे नेमकी किती मोठी आणि किती सुशिक्षित होती, तर कराचीतच मराठी पुस्तके छापलीही जात होती आणि प्रकाशितही होत होती.
- सुधींद्र कुलकर्णी