आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज हा माझा चौथा ग्रंथ आपल्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे. प्रबोधनाचे वारसदार हे माझे पहिले पुस्तक, त्यानंतर मातंग समाजाचा इतिहास हा माझा संशोधनपर ग्रंथ माझ्या जीवनात खरोखरच मैलाचा दगड ठरला. या ग्रंथाने प्रचंड लोकप्रियता मला मिळवून दिली शिवाय पुणे येथील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक संस्थेने ग्रंथोत्तेजक पुरस्कारासाठी या ग्रंथाची निवड गेली. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेने वैचारिक साहित्याचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार देऊन ग्रंथाची दखल घेतली. त्यानंतर विसाव्या शतकातील मातंग समाज या ग्रंथाच्या दोन आवृत्या निघाल्या. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे मी अक्षरशः भारावून गेलो. त्याचबरोबर माझ्या लेखणीची ऊर्मीही झपाट्याने वाढली हे प्रामाणिकपणे नमूद करतो.
विद्यार्थिदशेपासून मी फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेत वाढलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा माझ्या मनावर अत्यंत खोलवर परिणाम झाला. प्रसिद्ध विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांनी म्हटल्याप्रमाणे “चळवळीत वावरताना आपण किती पुढे गेलो यापेक्षा आपण कोणत्या दिशेने जात आहोत ते महत्त्वाचे ठरते.” या अनुषंगाने विचार केला तर श्रमिकांच्या विचारांच्या चळवळीशी आपले नाते असल्याने धन्यता वाटते. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी चळवळीत अधिक भर पडावी या हेतूने आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या ग्रंथाचे लेखन करण्यास मी सिद्ध झालो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सव तीन वर्षांपूर्वी साजरा झाला, यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा स्वीकार जगभरात झालेला आपण पाहिला. महामानवाच्या चळवळीचे आता जगभर आकर्षण झालेले आहे त्या डॉ. बाबासाहेबांच्या व्यापक चळवळीचा लाभार्थी ठरलेल्या भारतातील कितीतरी जाती-जमाती डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणून पुढे आल्या आहेत. लहानपणापासून बाबासाहेबांची ओळख ही दलितांचे कैवारी अशीच आम्हाला आहे. मात्र दलितांचा कैवार घेणाऱ्या दलित जातीतील सगळ्यांपर्यंत डॉ. बाबासाहेब पोहोचवण्यात येथील चळवळीला अद्यापही यश आलेले नाही हे वास्तव आहे.
डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन करीत असताना जाणीवपूर्वक मी वंचित जाती-जमाती, भटके विमुक्त, सर्वधर्मीय, आर्थिक मागास अशा घटकांचे डॉ. बाबासाहेब कसे सुधारक आहेत ते मांडताना मला या ग्रंथाची आवश्यकता वाटू लागली. महाराष्ट्रात पारंपरिक महार मांग संघर्ष रेखाटण्याऐवजी दलित समुदायातील या दोन घटकांना चळवळीत एकत्र सांधण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल, असे मला वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत महाड सत्याग्रहापासून ते धर्मांतरापर्यंत येथील हजारो मातंग बांधवांचा उल्लेखनीय सहभाग राहिलेला आहे. स्वतः बाबासाहेबांनी मातंगांना सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तसा प्रयत्न आंबेडकरोत्तर काळात झाला नाही. मातंग समाज आंबेडकरी चळवळीत सर्व पातळीवर कसा सहभागी होता याची सोदाहरण नोंद या ग्रंथात मी घेतली आहे. मातंग समाजाच्या वैचारिक संदिग्धतेत आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल, अशी माझी भावना आहे.
आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज शोधताना महाराष्ट्रभर फिरून पुरावे गोळा केले, मुलाखती घेतल्या, चर्चा केली. त्या वेळी भयंकर उदासीनता जाणवली त्यामुळे तारेवरची कसरत करीत हा ग्रंथ साकारता आला. या ग्रंथाचे लेखन करताना डॉ. दीपक गायकवाड, मा. नरसिंग घोडके पुणे, डॉ. विजय कुमठेकर जालना, मा. चंद्रकांत वानखेडे नागपूर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. प्रसिद्ध विचारवंत व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. रावसाहेब कसबे यांची पाठराखण व आदरणीय मोतिराम कटारे यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली हे या ग्रंथाचे भाग्यच म्हणता येईल. कृतज्ञताबुद्धीने त्यांचा मी ऋणनिर्देश करतो. त्याचबरोबर आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी आणि प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांचे मला नेहमीच प्रोत्साहन असते हेही आनंदपूर्वक नमूद करायला हवे.
प्रस्तुतचा ग्रंथ अधिकाधिक सुरेख व परिपूर्ण व्हावा यासाठी आग्रही असलेली माझी मित्रमंडळी व महाराष्ट्रातील सर्वतोपरीने मदत केलेले सर्व मित्र व कार्यकर्ते यांचे योगदान अनमोल आहे. यात सर्वस्वी प्रा. विजय सावंत, डॉ. मारोती कसाब, प्रा. ज्ञानोबा कदम,. शरद कोकाटे, प्रकाश पोळ, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर या सर्वांचा मी आभारी आहे.
माझे मेहुणे एन. बी. कुमठेकर, दिनकर गायकवाड, देवधर गायकवाड, भाऊ श्री. रघुनाथ, श्री. विनोद, चि. मनोज, बहीण सौ. रुपाली, सौ. माया, सौ. राधा आणि माझी अर्धांगिनी सौ. सुचिता हिची अनमोल साथ असल्याने माझा लेखन प्रवास सुखकर झाला. माझ्या आई-वडिलांनी काढलेल्या अफाट कष्टाची, आमच्यासाठी झिजवलेल्या आपल्या देहाची जाणीव ठेवून मी सतत लिहीत असतो. माझी प्रेमळ व समंजस बालसंपत्ती चि. सार्थक, कु. दीपा, चि. सारंग, चि. शुभम, कु. विद्या, कु. गौरी, चि. अनुराग, चि. लक्ष्मीकांत आणि कु. लक्ष्मी यांचेही अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभले.
त्याचबरोबर या ग्रंथाची सुबकता वाढवणारे आमचे मित्र प्रसाद कोरगावकर यांनी अत्यंत आपुलकीने टंकलेखन केले.त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या मायेच्या, ममतेने ओथंबलेल्या जिव्हाळ्याच्या भावनेने भिजलेल्या आणि आपुलकीच्या सुगंधाने दरवळणाऱ्या आपल्या सर्वांच्या शुभेच्छा गाठीशी राहण्याइतपत आपण सुश वाचकांनी ज्याप्रमाणे मातंग समाजाचा इतिहास व विसाव्या शतकातील मातंग समाज हे ग्रंथ लोकप्रिय केलात व प्रेमाचा वर्षाव केलात त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या ग्रंथाचे स्वागत कराल आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाल, अशी अपेक्षा करतो.
ई-आवृत्तीच्या निमित्ताने
‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ हे पुस्तक लोकवांगमय गृह मुंबई यांच्या कडून प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कोरोनाचे संकट उभे राहिले मात्र या पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.सर्व माध्यमामध्ये या पुस्तकाची चर्चा सातत्याने होत असते.नांदेड,लातूर,पुणे,सांगली अशा चार ठिकाणी या पुस्तकावर चर्चासत्रे यशस्वीपणे पर पडली.आदरणीय डॉ.भालचंद्र कांगो,डॉ.सुरेश वाघमारे,प्रा.गौतमीपुत्र कांबळे.प्रा.सुकुमार कांबळे श्रीमती विद्या ठाकूर,किशोर जाधव या मान्यवरांनी या पुस्तकावर मौलिक भाष्य केले. याशिवाय अनेक समीक्षकानी व विविध मासिके,दैनिके यांनी उत्तम दखल घेतलीत्यामुळे .पहिली आवृत्ती होतोहात संपल्याने दुसरी आवृत्तीही आली.दरम्यान या पुस्तकाच्या ई-आवृतीची मोठी गरज होती.याचा विचार करून ‘पुस्तकमार्केट ‘च्या माध्यमातून आता ई-आवृत्ती आपल्या समोर येत आहे.याचे सारे श्रेय आमचे मित्र डॉ.मिलिंद कसबे यांना आहे.डॉ.कसबे व सर्व टीमचे मनापासून आभार मानतो.माझ्या या ई-आवृतीचे आपण उत्स्फूर्त स्वागत कराल असा विश्वास वाटतो.
- डॉ. सोमनाथ कदम
कणकवली