प्रा. डॉ. सौ. मंगल डोंगरे या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून गेल्या सत्तावीस वर्षांपासून कार्यरत आहेत.
संतसाहित्य, लोकसाहित्य आणि मराठी वाङ्मयातले विविध प्रवाह असा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात चाळीस शोधनिबंध सादर केले आहेत. संत तुकारामांच्या कवितेतील अलंकार : एक अभ्यास या विषयावर त्यांचे पीएच. डीचे संशोधन असून मराठी साहित्याच्या संशोधनात त्या नेहमीच सक्रिय असतात.
महाविद्यालय ते विद्यापीठ स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून गौरविले गेले आहे. योगप्राणायाम, महिला सबलीकरण, महाविद्यालयातील वाङ्मय व वादविवाद मंडळ अशा वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्राध्यापिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.