Welcome to Pustakmarket !
Home

Details of
साहित्य आणि लोककला : मार्क्स-आंबेडकरी दिशा

Book Name साहित्य आणि लोककला : मार्क्स-आंबेडकरी दिशा
Author डॉ. मिलिंद कसबे
Publish Date 06:52 am, 19-Apr 21
Category Literature
पूर्ण ई-बुक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Book Description

प्रस्तावना
डॉ .यशवंत मनोहर

मिलिंद कसबे या नावाचा लक्ष्यार्थ एक जबाबदार वाङ्मयाभिरूची आणि जीवनाभिरूची असाच घेणे मला नेहमीच आवश्यक वाटलेले आहे. अभिरूची हे सर्वोच्च नैतिकतेचेच दुसरे नाव आहे. ही नैतिकताच त्यांच्या साहित्यात प्रकटते. मिलिंद कसबेंची वाङ्मयीन वाटचाल ही त्यांच्या जिवंत अर्थशोधाचीच वाटचाल आहे. त्यामुळेच त्यांच्या लेखनात निष्ठांचे आणि कष्टांचे लावण्य उगवत राहते.
साहित्य आणि लोककला: मार्क्स-आंबेडकरी दिशा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी मिलिंद कसबे यांचे अंतःकरणपूर्वक अभिनंदनही करतो आणि त्यांना सदिच्छाही देतो.
मराठीत मार्क्सवादी सैद्धान्तिक आणि उपयोजित समीक्षाही आहे आणि आंबेडकरवादी सैद्धान्तिक आणि उपयोजित समीक्षाही आहे. हे दोन्ही ज्ञानव्यवहार शोषणविहीन समाजजीवनाचाच आग्रह धरणारे आहेत. या दोन्ही समीक्षाक्षेत्रात दिग्गजांनी वजनदार लेखन केलेले आहे. ही दोन्ही ज्ञानक्षेत्रे व्यवस्थांतरासाठी निकराची झुंज देताना दिसतात. मिलिंद कसबे या दोन्ही ज्ञानव्यवहारांमध्ये काही अनुबंध शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.
मिलिंद कसबेंनी आजवर तीन संपादने केली आहे आणि तीन स्वतंत्र ग्रंथांचीही निर्मिती केली आहे. व्यवस्थांतराच्या चळवळीत ते स्वतः सक्रिय आहेत. त्यांच्या स्वतंत्र पुस्तकांमधून त्यांचे दोन कल आपल्यापुढे येतात. एक कल जीवनसमीक्षेचा आहे आणि दुसरा कल साहित्यसमीक्षेचा आहे. साहित्याचा विषय जीवनच असतो आणि जबाबदार साहित्य हा जीवनाचाही विषय असतो. हा देण्याघेण्याचा सोहळा दोघांनाही सुंदर आणि अन्वर्थक करणाराच असतो.
हे दोन्ही मूलाधार अर्थात एकाच झाडाच्या दोन फांद्यांसारखे असतात. समीक्षा हा ज्ञानव्यवहारच असतो आणि ज्ञान हाही प्रकृतितः समीक्षाव्यवहारच असतो. ज्या जीवनाचे अन्वयार्थ मांडताना साहित्यकृती जन्माला येते त्या जीवनाची समीक्षाच विचाराला जन्म देते. जीवनाला शहाणीव देणाऱ्या साहित्यकृतीचा विचार समीक्षेला जन्म देतो. जीवनाचे भाष्य आणि जीवनभाष्यावरचे भाष्य असे विचाराचे आणि समीक्षेचे नाते असते. ही द्विविध ज्ञानक्षेत्रे परस्परांशी अशी रक्ताच्या नात्यानेच बांधलेली असतात. म्हणूनच जीवनाची समीक्षा म्हणजे विचार आणि साहित्याचा विचार म्हणजे समीक्षा असे आपण म्हणतो. या मूलभूत ज्ञानव्यवहारांची एकजीव प्रस्थापना आपल्या लेखनातून करणाऱ्या मिलिंद कसबेंचे मी ससदिच्छा अभिनंदन करतो.
हा कल आपल्याला त्यांच्या आजवरच्या लेखनातून जाणवतो आणि त्यांच्या पुढील निर्मितीची दिशाही आपल्यापुढे ठेवतो.
आजच्या गुंतागुंतीच्या काळात मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी मूल्यदृष्टीनुसार लोककलाचे अन्वर्थन कसे करायला हवे तसेच मार्क्सवादी साहित्यमूल्यांनी आणि आंबेडकरवादी साहित्य मूल्यांनी लोकसाहित्याचे मूल्यमापन संभवते काय याही प्रश्नाचा विचार अत्यंत साक्षेपाने मिलिंद कसबेंनी या पुस्तकात केला आहे. ही लोककलांमधील जीवनमूल्यांची आणि सौंदर्यमूल्यांचीच तपासणी आहे. मिलिंद कसबेंनी ही तपासणी अत्यंत जबाबदारीने केली आहे असेच मी म्हणेन.
- यशवंत मनोहर


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!