Welcome to Pustakmarket !
Home

गांधी :पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा

Book Name : गांधी :पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा
Author : रावसाहेब कसबे
Publisher : लोकवाङ्मय गृह
ISBN no : ९७८-९३--८२९००६-८३-4
Category : Ideological
Price: 1000.RS
Discount Price : 900 RS

Book description

डॉ .रावसाहेब कसबे यांच्या ‘गांधी:पराभूत राजकारणी व विजयी महात्मा ‘या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील काही भाग ...
हा ग्रंथ दि. २० मार्चला लिहून संपला आणि दि. २३ मार्च२०२० पासून कोविडच्या महामारीने जगात उच्छाद मांडल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. गेल्या पाच महिन्यांच्या काळात जगभर आणि भारतात जे काही घडले, त्यामुळे मन अतिशय दुःखी, उदास आणि असहाय बनले. हा कोरोना नामक व्हायरस निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याचा शोध अद्याप लागायचा आहे. परंतु त्याला जगाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या ज्या श्रीमंत वर्गाच्या हातात आहेत, तेच जबाबदार आहेत. निसर्गाने असे अनेक विषाणू निर्माण करून ठेवले आहेत की जे निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्याचे काम अतिशय जलद गतीने करीत असतात. जेव्हा माणसाकडून पर्यावरणाचा ऱ्हास होतो तेव्हा ते अधिक आक्रमक बनतात आणि मानवजातीला धडा शिकवितात. या सधन आणि श्रीमंतवर्गातील भांडवल दारांची संपत्तीची लालसा किंवा लोभ इतका वाढलेला आहे की त्यांना संपूर्ण जग आपल्या अंकित करावयाचे आहे. त्यासाठी प्रचंड उत्पादन, बाजारपेठा लुबाडण्यासाठी युद्धे आणि निसर्गाला कधीही भरून न येणाऱ्या जखमा करणे हे उद्योग ते अतिशय क्रूरपणे करताना इतिहासाने पाहिले आहे. आजही आपण तेच असहायपणे पाहत आहोत. गेल्या तीनशे वर्षांचे फलित म्हणजे भांडवलशाहीने निर्माण केलेली प्रचंड संपत्ती. परंतु तिची अर्धी मालकी फक्त एक टक्का संख्या असलेल्या अब्जाधीशांकडे आहे. उरलेली अर्धी नव्याण्णव टक्के लोकांकडे. नोबेल प्राईजप्राप्त अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिग्लीस्ट यांचे हे म्हणणे आहे. जागतिकीकरणाच्या शिल्पकारांपैकी तेही एक होते. भारतात तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर फक्त काही घराण्यांचाच ताबा आहे. आपल्याच देशात कोट्यवधी लोक स्थलांतरित आहेत. त्यांच्या राज्य सरकारांचे गेल्या सत्तर वर्षांतील हे कर्तृत्व. विश्वगुरू होण्यासाठी निघालेल्या देशात या महामारीच्या काळात माणुसकीचे दर्शन अतिशय कमी आणि लुबाडणुकीचेच अधिक दिसत होते. हा माझा बहुधा शेवटचा ग्रंथ असल्याने गेल्या पन्नास वर्षांत जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्या ज्या पूर्वसुरींचे बोट धरून वैचारिक प्रवास केला, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच संधी आहे. माझे शालेय जीवन अतिशय अँटी मार्क्सिस्ट आणि अँटी गांधी वातावरणात गेले. त्यामुळे मनात त्यांच्याबद्दल फारसे ममत्व नव्हते. १९६३ साली मी अहमदनगर महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धांना खूप उत्तेजन मिळाले. त्या स्पर्धांच्या विषयांनी वाचनाचे वेड लावले. सुरुवात झाली ती वैचारिक साहित्याने. पहिला ग्रंथ हातात आला तो आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा गांधीवाद. पुढे आवडलेला लेखक - मग तो वैचारिक साहित्य लिहिणारा असो की सर्जनशील. त्याचे मिळेल ते सर्व साहित्य वाचायला सुरुवात केली. त्याला नाद म्हणा, वेड म्हणा किंवा व्यसन. आचार्य जावडेकरांच्या शास्त्रीय समाजवाद, राजनीतिशास्त्र परिचय आणि आधुनिक भारत या ग्रंथांनी एका नव्या वैचारिक जगाकडे नेणारी केवळ एक वाटच दाखविली असे नाही; तर ते जग किती विशाल आणि समृद्ध आहे याचीही जाणीव करून दिली. स्वत:च्या मर्यादा व अज्ञान मान्य केल्याशिवाय आणि मनात ज्ञानपिपासा असल्याशिवाय त्या अमर्याद जगात प्रवेशच करता येत नसतो. हे मला आचार्यांचा 'धर्ममार्गावरील माझे वाटाडे'हा लेख वाचताना समजले.आचार्यांनी गांधीवाद आणि मार्क्सवाद यांचा सुरेख मेळ घालून 'सत्याग्रही समाजवाद’ या नावाच्या एका नव्या विचारप्रणालीला जन्माला घातले. त्यांनी आमच्या पिढीला जसा गांधीवाद समजावून दिला तसाच मार्क्सवाद. अभिनिवेशशून्य पद्धतीने सोप्या मराठी भाषेतून. आपली मातृभाषा जितक्या मायेने वाचकांच्या विचारांचा पाया भक्कम करेल तितक्या अन्य भाषा करीत नसतात. म्हणून शालेय शिक्षण मातृभाषेतच घेणे अधिक चांगले. मातृभाषा कोणतीही संकल्पना संदिग्ध ठेवीत नसते. त्यानंतरच इंग्रजी भाषा त्या भक्कम पायावर इमले चढविण्यास अनिवार्य असते. पाया किती भक्कम आहे, हे त्यावरील इमल्यांची संख्या ठरवीत असते. विचारांच्या अभिव्यक्तीसाठीही मातृभाषाच उत्तम. जगातील अनेक महान विचारवंतांनी आपापल्या मातृभाषेतच लिखाण केलेले आहे. मग ते कार्ल मार्क्स असोत की सिग्मंड फ्रॉईड. टॉलस्टॉय असोत की गांधीजी. गांधीजींनी लिहिलेली तिन्ही पुस्तके त्यांच्या मातृभाषेत, गुजरातीत, लिहिलेली आहेत. या सर्वांच्या लिखाणाचा इंग्रजीत अनुवाद झाल्यानंतरच त्यांना जागतिक मान्यता मिळाली. आचार्य जावडेकरांनाही ती मिळाली असती. परंतु त्यांचे लिखाण इंग्रजीत अनुवादित झाले नाही. इंग्रजी भाषेचे आजचे महत्त्व त्यामुळेच अधोरेखित होते.
आचार्य जावडेकरांकडून लाभलेल्या तीन महत्त्वाच्या प्रमुख गोष्टींचा ठसा मनावर कायम राहिला. पहिली, कोणत्याही अभ्यासकाने जन्मभर कोणत्यातरी एकाच व्यक्तीला गुरू मानू नये. दुसरी, कोणताही एक ग्रंथ प्रमाण मानू नये आणि तिसरी, कोणत्याही महापुरुषाच्या लेखनाचा स्वतंत्रपणे अर्थ लावून तुम्हाला तुमचे स्वतंत्र मत बनविता आले पाहिजे. तसे घडले नाही तर तुम्ही सांप्रदायिक बनण्याचा धोका असतो आणि सांप्रदायिक अभिनिवेश तुम्हाला ज्ञानापासून वंचित ठेवतो.
संगमनेर महाविद्यालयात १९७३ साली राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा शिक्षक बनल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण, राजकीय विचारवंत, राजकीय तत्त्वप्रणाली, राजकीय समाजशास्त्र, भारतीय राज्यघटना आणि राजकीय विश्लेषण या विषयांचा अभ्यास करणे भागच होते. तो काळ अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन नवनवीन ग्रंथांचा अभ्यास करून शिकविण्याचा होता. त्यामुळे वर्ग भरगच्च असत. आपल्या जीवनात आवडीचा व्यवसाय करण्याची संधी मिळणे यासाठी भाग्य असावे लागते. ते मी तीन दशकांहून अधिक काळ भोगले.
साधारणतः १९८० च्या दशकाच्या शेवटी एरिक फ्रॉम (Erich Fromm १९००-१९८०) या तत्त्वज्ञ मानसशास्त्राच्या समग्र लिखाणाशी परिचय होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात क्रांतिकारी घटना होती. त्यांनी माणसाचा विविध अंगांनी केलेला विचार, त्यांचा विविध ज्ञानशाखांचा असलेला अभ्यास यामुळे भारावून जाणे स्वाभाविक होते. त्यांच्या विविध ग्रंथांनी एकाच वेळी कार्ल मार्क्स आणि सिग्मंड फ्रॉईड यांच्या विचार आणि तत्त्वज्ञानाच्या गाभ्यापर्यंत पोहचता आले. त्यांच्या लिखाणामुळेच माझ्यासाठी विविध ज्ञानशाखांची दारे खुली झाली. त्यांनी कार्ल मार्क्स अधिक खोलवर समजावून दिला आणि मार्क्स यांचे लिखाण मुळातून वाचण्याची प्रेरणाही दिली. त्यांनी फ्रॉईड यांचे माहात्म्य विशद करतानाच त्यांच्या मर्यादांवरही नेमके बोट ठेवल्यामुळे फ्रॉईड यांचे अनेक शिष्य त्यांना का सोडून गेले असावेत, याचा अंदाज आला. कार्ल युंग यांचा कल बौद्ध धर्माकडे होता. त्यांनी जगद्विख्यात बौद्ध पंडित डॉ. डी. टी. सुझुकी यांच्या An Introduction to Zen Buddhism या ग्रंथाला लिहिलेले 'फॉरवर्ड' पाश्चिमात्य जगातील आध्यात्मिक पोकळीवर केलेले महत्त्वाचे भाष्य आहे. सुझुकी आणि स्वत: एरिक फ्रॉम यांनीही एकत्रित काम करून Zen Buddhism and Psychoanalisis संपादित केलेला ग्रंथ म्हणजे पौर्वात्य तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य मानसशास्त्रातील मनोविश्लेषण विभागाला दिलेली अमोल भेट ठरली. एरिक फ्रॉम आणि ई. एच. कार या इतिहासकाराच्या लिखाणातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे कोणतीही ज्ञानशाखा सुटी, स्वतंत्र किंवा स्वायत्त नसते. तिची अनेक मुळे इतर ज्ञानशाखांतही रुजलेली असतात. सर्व ज्ञानशाखांचा विषय एकच असतो तो म्हणजे माणूस आणि त्याचे पर्यावरण. पर्यावरणाचे माणसावर होणारे परिणाम आणि माणसाने पर्यावरणात केलेला बदल, यांच्या परिणामाचा अभ्यास. या सर्व पार्श्वभूमीच्या शिदोरीच्या आणि पौर्वात्य प्राच्यविद्येच्या साहाय्यानेच मी माझा मानव आणि धर्मचिंतन, धर्मग्रंथ आणि मानवीजीवन प्रवाह आणि भक्ती आणि धम्म हा एकूण सोळाशे पन्नास पृष्ठांचा त्रिग्रंथी लेखनप्रकल्प पूर्ण करू शकलो.
मोहनदास करमचंद गांधी हा महात्मा आध्यात्मिक होता. म्हणून स्वत:ला जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे समजणारे गांधींकडे तुच्छतेने पाहतात. त्यापैकी काहींचा गांधी हा टवाळीचा विषय असतो. आपण सर्वज्ञ आहोत अशी समजूत करून घेतली की आपण स्वत: सोडून इतर सर्व जग अज्ञानी मानणे हे ओघाने येतेच. अध्यात्म हा एक अतिशय निसरडा शब्द आहे. तो विज्ञानाच्या, बुद्धीच्या कक्षेत बसत नाही म्हणून विज्ञाननिष्ठ, धर्मनिरपेक्ष व्यक्ती त्याच्यावर नाराज आहेत. ही सर्व मंडळी दोन गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. पैकी एक धर्म आणि अध्यात्म यात फरक आहे आणि दुसरी विज्ञानाच्या विकासक्रमातील अभिजात किंवा रूढ़ विज्ञान व नवविज्ञान यातील फरक नीट समजून घेत नाहीत. मी या विषयातील काही तज्ज्ञ नाही. परंतु तरीही एक माणूस म्हणून हा विषय समजून घेणे मला आवश्यक वाटले. म्हणून त्यासंबंधी मी अन्यत्र विस्ताराने लिहिले आहे. धर्मांचा जन्मच समाजधारणेसाठी असतो. तो सामाजिक असल्याने तो व्यक्तीच्या बाह्य जीवनाला नियंत्रित करण्यासाठी कठोर नियम तयार करीत असतो. त्याच्या सर्व नाड्या पुरोहितवर्गाच्या हातात असतात. राज्यसत्ता त्याला संरक्षण देत असते. जास्तीतजास्त जनतेला अंध:श्रद्ध ठेवणे हे पुरोहित आणि राज्यकर्त्यांचे मुख्य काम असते. कारण जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे, हे दोघांच्याही अस्तित्वाला धोका उत्पन्न करणारे असते.
अध्यात्म हे पूर्णपणे व्यक्तिगत असते. अध्यात्माचा प्रवासच सुरू होतो तो स्वत:ला प्रश्न विचारून. मी कोण आहे? हा तो प्रश्न. या प्रश्नाचा उगम मानवी उत्क्रांतीच्या काळात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्राणिसृष्टीतील एका प्राण्याच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे तोच प्राणी प्राणिसृष्टीचा त्याग करून माणूस बनला. मानवी उत्क्रांतीत घडलेली ही पहिली क्रांती. तिलाच वैज्ञानिक ‘बोध क्रांती (Cognitive Revolution) या शब्दाने संबोधतात. मी कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर होते,मी,मीआहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे ठरले तर त्याला आत्मभान (Self-realization) म्हणता येईल. या आत्मभानाने माणसाच्या अंतर्विश्वाला आकार दिला. या आत्मभानानेच मी इतरांपेक्षा वेगळा आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळेच माणूसप्राणी निसर्गातून आणि प्राणिसृष्टीतून बाहेर पडला. त्या बाह्य प्रवासातच त्याने स्वत:ची अशी एक स्वतंत्र मानवी सृष्टी, एक बाह्य विश्व निर्माण केले. संपूर्ण जगाचा मानवी इतिहास म्हणजे माणसाने त्याच्या अंतर्विश्वाचा आणि बाह्य विश्वाचा प्रवास करताना तो निर्मितीच्या आणि विध्वंसाच्या, सर्जनशील तेच्या आणि पुनर्निर्मितीच्या कोणकोणत्या अवस्थेतून आजच्या अवस्थेपर्यंत येऊन पोहचला, याचा तपशील आहे. अध्यात्म माणसाचे स्वांतर्गत अंग बनायला सत्तर हजार वर्षे उलटून गेली तर आज अस्तित्वात असलेल्या धर्मांचे आयुष्य केवळ अडीच ते तीन हजार वर्षांचे.
अध्यात्म म्हणजे माणसाला त्याच्या बाह्य विश्वाप्रमाणेच एक अंतर्विश्वही असते आणि या दोन विश्वांतील संघर्षातून व संवादातून एकमेकांवर परिणाम करीत मानवी जीवन पुढे जात असते; विकसित होत असते, असे मानणे होय. ही दोन्हीही विश्वे एकमेकांपासून पूर्ण स्वतंत्र नसतात. त्यांना मानवी विवेक नियंत्रित करीत असतो. त्यामुळेच माणसात जशी एक बाह्यदृष्टी असते तशीच एक अंतर्दृष्टीही असते. आजचे विज्ञान स्थूलमानाने दोन विभागांत विभागले जाते. त्यांपैकी एक देकार्त आणि न्यूटन यांच्या यंत्रशास्त्रीय दृष्टिकोनावर आधारलेले 'अभिजात' (Classical) किंवा रूढ विज्ञान आणि दुसरे आईन्स्टाईन यांच्यापासून सुरू झालेले आणि मॅक्स प्लॅक, नील बोर आणि हायजेनबर्ग इत्यादी वैज्ञानिकांनी विकसित केलेले नव विज्ञान.रूढ विज्ञानातील मन आणि शरीर यांची फारकत तांत्रिक पद्धतीने केली गेल्याने विज्ञान आणि तत्त्वज्ञान व अध्यात्म यांचे एकेकाळी असलेले संबंध पूर्णपणे तुटून गेले होते. अभिजात विज्ञानातील तांत्रिक दृष्टिकोन इतका प्रभावी होता की प्रत्येक ज्ञानशाखा स्वत:ला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करण्यासाठी स्पर्धा करू लागल्या. सर्व सामाजिक शास्त्रे आणि इतिहास व तत्त्वज्ञानसुद्धा विज्ञानाचे अनुकरण करून अधिक काटेकोर, अधिशास्त्रीय बनण्याचा प्रयत्न करीत होते. तत्त्वज्ञान (Philosophy), ज्याच्या कक्षेत अध्यात्म येते असे मानले जाते तेसुद्धा अध्यात्म शास्त्रीय नसल्याने त्याच्या विरोधात उभे राहिले. एकोणिसाव्या शतकातील प्रमुख तत्त्वज्ञान्यांपैकी डेविड ह्यूम यांच्यासारखे अनुभववादी (impirialist) आणि सॅम्युएल कांट यांच्यासारखे काही तत्त्वज्ञ अध्यात्माच्या अर्थपूर्णतेलाच आव्हान देत होते. परंतु ते फार काळ टिकले नाही. कारण पुढील काळात नव विज्ञानच अध्यात्माच्या अधिक जवळ जाणारे शोध लावू लागले.
एकेकाळी रेने देकार्त या महान शास्त्रज्ञाने मी विचार करतो म्हणून माझे अस्तित्व आहे हे प्रसिद्ध वचन उद्गारून माणसाचे विचार करणारे मन (mind) आणि त्याचे मूर्त शरीर म्हणजे जडद्रव्य (matter) यांची फारकत केली. त्याचप्रमाणे यंत्राचे नियम आणि निसर्गनियम यात कोणताही फरक नाही, असे जाहीर करून विश्व हे एक यंत्र आहे, हा विचार केंद्रस्थानी आणला. आयझॉक न्यूटन यांनी विश्वातील ग्रह- ताऱ्यांपासून ते सामान्य दगडापर्यंतच्या सर्व पदार्थांची गती नियंत्रित करणारे गतीचे नियम शोधून काढले. त्यानंतर त्यांनी जाहीर केले की, विश्व हे नि:संशयपणे एका महाप्रचंड यंत्रासारखे दिसते. त्यानंतर न्यूटनच्या या यंत्रशास्त्राला (mechanics) थेट नियततत्त्वादाशी (determinism) जोडले गेले. त्यामुळे अनेक ज्ञानशाखा शास्त्रीय बनविण्यासाठी त्या ज्ञानशाखांतील विषयाचा विचार यांत्रिक पद्धतीने करू लागल्या. त्यांचा माणूस आणि समाजाशी असलेला संबंध तुटला. अर्थशास्त्रासारखी ज्ञानशाखा फक्त जास्तीतजास्त उत्पादन आणि जास्तीतजास्त नफा कसा मिळेल, हे समजावून देणारे शास्त्र बनले. त्याचाही माणूस आणि समाजाशी संबंध शिल्लक राहिला नाही. पुढील काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विविध देशांतील शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद करून विश्वासंबंधी एक नवा सिद्धान्त मांडला. त्यालाच विश्वासंबंधीचा पुंज गतिशास्त्राचा (Quantum Mechanics) सिद्धान्त म्हणतात. त्याची मी विस्ताराने अन्यत्र चर्चा केलेली आहे. या पुंज गतिशास्त्राच्या सिद्धान्ताने केवळ न्यूटनच्या यंत्रशास्त्रालाच प्रश्नांकित केले असे नाही तर त्यापुढील अनिश्चिततेच्या तत्त्वाने (Principal of Uncertainly) नियततत्त्ववादालाही (determinism) आव्हान दिले. या सिद्धान्ताने जगाला जे विश्वदर्शन दिले त्यात "आपल्यासमोर जे विश्व आहे ते अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या घटनांचे तंतुजाल (tissue) असून ज्यात प्रत्येक प्रकारचे परस्परसंबंध आलटत पालटत असतात अथवा एकमेकांत प्रविष्ट होतात किंवा एकमेकांना जोडले जात असतात आणि त्यातून संपूर्णाला एक विशिष्ट पोत (texture) मिळवून देत असतात. या सिद्धान्ताने अणूच्या अंतर्गत असलेले कण वस्तू नसून वस्तूमधील आंतरिक संबंध असतात आणि या आंतरिक संबंधाचे पुन्हा इतर वस्तूंशी संबंध असतात. पुंज गतिशास्त्राच्या सिद्धान्ताने आपण कोणत्याही वस्तूशी येऊन थांबू शकत नाही. थांबतो ते फक्त त्या विशाल अंतर्गत संबंधापर्यंत जाऊनच. आपण जेव्हा एखाद्या पदार्थाचे पृथक्करण करतो तेव्हा विश्वाच्या उभारणीसाठी उपयोगात आणलेला पायाभूत बांधकामाचा दगड (building block) आपल्याला सापडतच नाही. तर त्याऐवजी तेथे आंतरिक संबंधाचे अत्यंत जटिल, किचकट व गुंतागुंतीचे भागन्भाग एकत्र जुळविणारे एक विराट जाळे आहे, असे आढळून येते. हे पुंज गतिशास्त्राच्या संशोधकाचे म्हणणे आपल्याला विश्व आणि माणसाकडे बघण्याची एक नवी दृष्टी देते. या आंतरिक संबंधाच्या विराट जाळ्यात आपण सुटे, एकाकी नाही तर आपले अस्तित्वच इतरांच्या अस्तित्वाशी जोडलेले आहे, याची जाणीव होते. त्यातून माणसातील आत्ममग्नता आणि अहंकार गळून पडणे अपेक्षित असते.
हायजेनबर्ग यांनी १९५९ साली Physics and Philosophy : The Revolution in Modern Science या नावाचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून विज्ञान आणि तत्त्वज्ञान व अध्यात्म यांचे मधल्या काळात तुटलेले संबंध पुन्हा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नव विज्ञानाची महती गाताना ते आजच्या सांस्कृतिक संघर्षाच्या, अण्वस्त्रांच्या किंवा दहशतवादाच्या माध्यमातून आपले वर्चस्व प्रस्थापित करायला निघालेल्यांच्या विरोधात उभे राहू शकते याची खात्री दिली. त्यासाठी शस्त्रास्त्रांच्या विनाशकारी रूपाचे स्पष्ट चित्र जनतेसमोर ठेवले पाहिजे आणि जगातील विविध सांस्कृतिक परंपरांना एका छत्राखाली नांदण्यासाठी एक संतुलन निर्माण केले पाहिजे. हे संतुलन माणसाच्या विचार आणि कर्म, त्याची कार्यक्षमता आणि ध्यानधारणेद्वारे निर्माण होऊ शकते. त्यांच्या या ग्रंथाचे शेवटचे वाक्य आहे, "A New kind of balance between thoughts and deeds, between activity and meditation." हे वाचल्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि गांधीजी यांची आठवण येणे साहजिक आहे. बुद्ध तर निरीश्वरवादी होते. अनात्म आणि अनित्य ही तत्त्वे त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया होती. गांधीजींचा ईश्वर काही दशरथ आणि कौशल्येच्या पोटी जन्मलेला राम नव्हता. तो कबीर समजत होते तसा होता. शेवटी विज्ञान हे प्रयोगक्षम, प्रोबेशनरी असल्याने विकास पावत राहणार आणि माणूसही उत्क्रांत होत जाणार. त्यामुळे आज जे सत्य वाटते ते उद्या असेलच असे नाही. परंतु माणूस मात्र त्याच्या शोधार्थ सतत पुढे जाईल हे निश्चित.
कोणत्याही महापुरुषाला त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्यात्यात गांधीजींना. त्यांनी आयुष्यभर माणसाच्या नैसर्गिक प्रेरणांशी म्हणजे पोटाची भूक आणि शरीरातील कामवासनेशी, समाजाशी आणि स्वत:शी केलेला संघर्ष अतिशय जटिल स्वरूपाचा होता. त्याला अनेक परिमाणे होती. त्यांनी सामाजिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनात अनेक प्रयोग केले. त्या वेळी त्यांच्या मनात कोणती आंदोलने उठत होती आणि ते त्यांना कसा प्रतिसाद देत होते, याचा मानसशास्त्रीय अभ्यास एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाने केला. परंतु त्यांच्या Gandhi's Truth : On the origins of Militent Non Voilence या महत्त्वाच्या ग्रंथाची आपल्याकडे फारशी चर्चा झाली नाही. गांधीजींच्या जीवनात, त्यांच्या सहवासात विविध व्यक्तिमत्त्वांच्या अनेक स्वदेशी आणि परदेशी स्त्रिया आल्या. गांधीजींचे त्या स्त्रियांशी संबंध नेमके कसे होते, हे व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय गांधीचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. याचा अतिशय महत्त्वाचा अभ्यास थॉमस वेबर यांनी त्याच्या Going Native, Gandhi's Relationship with Western Women या ग्रंथात केला आहे. भारतीय स्त्रियांबाबतचा अभ्यास अद्याप व्हावयाचा आहे.
गांधीजींना सर्वात छळले ते त्यांच्यात तीव्र रूपात असलेल्या कामवासनेने. म्हणून त्यांना सिग्मंड फ्रॉईड समजून घेण्याची इच्छा होती. ते काम प्रा. निर्मलकुमार बोस करणार होते. परंतु ते अपूर्णच राहिले. जगातील अनेक संस्कृतींनी कामवासनेला अतिशय तुच्छ, अपवित्र, अनैतिक मानून तिचा धिक्कार केलेला आहे. भारतीय हिंदू संस्कृतीने तर अधिक. कारण वर्ण आणि जातिसंकराची भीती होती. त्यामुळे अन्नाइतकेच महत्त्व असलेल्या या नैसर्गिक प्रेरणेचे, कामवासनेचे कृत्रिमरीत्या दमन करणारे जग हे दमनाचे कारागृहच बनले होते. सध्याच्या काळात ते तितके राहिलेले नाही. सिग्मंड फ्रॉईड हे पहिले मानसशास्त्रज्ञ की ज्यांनी माणसाच्या मानसशास्त्रीय अभ्यासात दोन प्रमुख क्रांतिकारी शोध लावले. पहिला, त्यांनी सत्याच्या संकल्पनेला व्यापक रूप देऊन माणसातील कामवासनेचा संबंध थेट सत्याशी जोडला. दुसरा, माणसाच्या अबोध मनाचा (Unconscious) किंवा नेणिवेचा शोध. या शोधांचा संबंधही माणसाच्या बाह्य आणि अंतर्विश्वाशी आहे. फ्रॉईड यांनी सत्याचा संबंध माणूस जाणते-अजाणतेपणे ज्याचा विचार करतो किंवा ज्यावर विश्वास ठेवतो केवळ त्याच्याशीच जोडला असे नाही, तर आपल्याला विचारच करायला लागू नये म्हणून माणूस ज्या गोष्टींचे दमन करतो त्याच्याशी थेट जोडला. माणूस ज्या गोष्टींना सत्य समजतो ते त्या गोष्टींच्या पलीकडे असते. या वास्तवापर्यंत भिडण्याची पद्धती त्यांनी शोधून काढली. फ्रॉईड हे करू शकले कारण त्यांनी माणसाच्या दमन करण्याच्या प्रवृत्तीचे आणि दमनाच्या समर्थनाचे परिणाम शोधून काढले होते. माणसाची असत्यापासूनची मुक्ती ही त्याच्या मनाच्या ठेवणीत आणि पर्यायाने त्याच्या दमनमुक्तीत आहे, हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. माणूस सत्य त्याच वेळी जाणू शकतो, ज्या वेळी तो आपले सामाजिक जीवन मानवी पद्धतीने, सन्मानपूर्वक, विवेकी मार्गाने भयमुक्त अवस्थेत आणि कोणत्याही लालसेशिवाय व्यतीत करीत असतो. फ्रॉईड यांच्यावर त्यांचे गुरू वॉन ब्रुक (Von Bruck) यांचा फार प्रभाव होता आणि ते यांत्रिक भौतिकवादी होते. त्यामुळे फ्रॉईड यांना दमनमुक्तीचे इतरही काही मार्ग आहेत, याची माहिती नव्हती. ज्यापैकी एका मार्गाचा गांधीजींनी अवलंब केला होता. अर्थात १९२० नंतर फ्रॉईड यांच्या विचारांचाही विकास झाला आणि ते माणसातील सहज प्रेरणांबद्दल नव्याने विचार करू लागले.
विसाव्या शतकाने भारताला महत्त्वाचे तीन सुपुत्र दिले. पैकी एक म. गांधी, दुसरे पं. जवाहरलाल नेहरू आणि तिसरे डॉ. आंबेडकर. पहिल्याने भारतीय जनतेला राजकीय जाणीव देऊन तिला स्वतंत्र केले. दुसऱ्याने स्वतंत्र भारताचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पाया मजबूत केला. आणि तिसऱ्याने भारताचे भवितव्य संविधानाची निर्मिती करून वचनबद्ध केले. त्यांपैकी नेहरूंचा गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या द्वेषमूलक प्रचार करून त्यांना इतिहासातून अदृश्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. ही अज्ञान आणि सुडाच्या भावनेतून आलेली कृतघ्नता आहे. नेहरू केवळ भारताचे राजकीय नेते नव्हते तर ते जागतिक पातळीवरील एक प्रमुख नेते होते, याची सरदार वल्लभभाई पटेल यांनी म. गांधींसमोर कबुली दिलेली होती. भारतासारख्या नवस्वतंत्र देशाच्या प्रगतीसाठी भारतात आणि जगात शांतता असणे, ही भारताची प्रमुख गरज होती. कारण शांतता ही प्रगतीची पूर्वअट असते. म्हणून ते जागतिक स्तरावरील शांततेचे अग्रदूत बनले. त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहावर आणि रशियाचे कृश्चेव यांच्या मध्यभागी उभे राहून त्या दोघांचे हात आपल्या दोन हातात घेऊन त्यांनी होऊ घातलेले जागतिक युद्ध थांबविले. त्यांनी स्वत:हून कधीही कोणाला मिठी मारली नाही आणि कोणाला झोक्यात बसवून झोके दिले नाहीत. जागतिक राजकारणात त्यांचा एक आदरयुक्त दरारा होता. संपूर्ण आशिया खंडात शांतता नांदावी म्हणून त्यांनी चीनला यूनोचे सदस्य बनविण्यासाठी स्वत: प्रयत्न केले आणि त्याला यूनोच्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी भारताच्या परराष्ट्रधोरणाचा पाया भक्कम केला. त्यांच्या तटस्थतेच्या धोरणाचा अर्थ कोणत्याही जागतिक सैनिकी गटात सामील न होणे आणि सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, असा होता. त्यांचा जागतिक आणि भारतीय इतिहासाचा तसेच राजकारणाचा व्यासंग आश्चर्यचकित करणारा होता. ते नेहमीच जनतेशी संवाद करीत. फुशारक्या मारण्याऐवजी स्वतःच्या मर्यादा सांगत. काय करायचे राहून गेले त्याबद्दल दुःख व्यक्त करीत. त्यांची दृष्टी भविष्याभिमुख होती. असा सुसंस्कृत, व्यासंगी आणि कलासक्त नेता भारताचा पहिला पंतप्रधान व्हावा, हे भारताचे भाग्य होते. भारताच्या उभारणीत त्यांचे असलेले योगदान कोणतीही शक्ती पुसून टाकू शकत नाही. निर्बुद्ध आणि प्रतिगामी तर नाहीच नाही.या ग्रंथाचा दुसरा विभाग गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्या संबंधांची विस्तृत चर्चा करणारा आहे. त्यापैकी कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे ठरविण्याचा नाही, ना त्यांचा एकत्रित मेळ घालण्याचा. ते दोघेही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच होते. ते दोघेही काळाच्या फार पुढे गेलेले होते. डॉ. आंबेडकर अधिक. म्हणूनच त्यांच्या शत्रुस्थानी असलेल्या सत्ताधाऱ्यांनासुद्धा त्यांचे नामस्मरण केल्याशिवाय सत्ता हाती घेता येत नाही आणि ती टिकविताही येत नाही. त्याचप्रमाणे आज त्यांच्या फोटोंचे फलक हातात घेतल्याशिवाय कोणतेही जनआंदोलन - मग ते विद्यार्थ्यांचे असो की स्त्रियांचे किंवा आणखी कुणाचेही - यशस्वी होऊ शकत नाही. आज जग त्यांच्याच नावाने भारताला ओळखते.
म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विस्तृत चर्चेची दोन कारणे आहेत. पैकी एक त्या दोघांचा असलेला वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आणि दुसरे मराठी भाषा. गांधीजींच्या स्वभावाचे अतिशय खोलवर विश्लेषण केले होते ते त्यांचे जिवलग मित्र सी. एफ. अॅन्ड्रयूज यांनी. गांधींना मोहन या नावाने संबोधणारे ते एकमेव. त्यांनी गांधीजींचे गुरू ना. गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजींबद्दल दि. ३० जानेवारी १९१४ रोजी एक विस्तृत पत्र लिहिले होते. ते या ग्रंथात उद्धृत केलेले आहे. त्यातील काही वाक्ये अशी : गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील काम आता संपलेले आहे... या क्षणी तर ते पूर्णपणे मोडून पडण्याच्या मार्गावर आहे... म्हणून त्यांनी स्वत:च्या आणि समाजाच्या भल्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून जावे. होय, समाजासाठीसुद्धा. कारण ते इथे राहिले तर ते इथल्या प्रत्येकाला ठेंगू (dwarf) बनवतील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी इथे नेतृत्व करण्यासाठी नेताच उरणार नाही. ही बाब कितीही दुःखद असली तरी ती स्पष्ट दिसत आहे. ...ते अनेकदा कोणत्याही गोष्टीचा साधकबाधक विचार न करता अविचारीपणाने मनमानी पद्धतीने (hasty) केवळ आदेश देत असतात. त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे प्रत्येकजण त्यांच्या विरोधी गेला... तर ते मी सहन करू शकणार नाही." कोणत्याही महापुरुषाला त्याच्या ताकदीचा समकालीन विरोधक लाभल्याशिवाय महापुरुष होता येत नसते आणि आपले श्रेष्ठत्वही टिकविता येत नसते. त्याच्याविना ते अनेकदा अहंकारी, स्तुतिप्रिय, आत्ममग्न आणि हुकूमशहाही बनत असतात. असा विरोधक गांधींना १९३० सालापर्यंत ना दक्षिण आफ्रिकेत लाभला ना भारतात. गांधीजींबद्दलच्या अॅन्ड्रयूज यांच्या भावनांप्रमाणेच अनेक मोठ्या काँग्रेसजनांच्याही होत्या. परंतु त्यांपैकी कोणीही त्यांना विरोध करू शकत नव्हते. ते स्पष्ट शब्दांत गांधींना काहीही सांगत नव्हते. कारण ते सर्वांचे 'महात्मा' होते. गांधीजींच्या सुदैवाने त्यांना भारतात १९३१ साली डॉ. आंबेडकरांच्या रूपाने एक समंजस, विद्वान परंतु तितकाच कडवा विरोधक लाभला. त्यामुळे त्यांच्यातील महात्म्याचे सारे अहंकार गळून पडण्यास सुरुवात झाली आणि ते आदर्श महात्मा बनू शकले.
गांधी-आंबेडकरांची पहिली भेट दि. १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबईतील मणिभवनात झाली. त्या वेळी गांधींचे वय बासष्ट तर आंबेडकरांचे एकेचाळीस होते. गांधी त्या वेळी विजयी मुद्रेने दात्याच्या भूमिकेत उच्चासनावर बसून सुका मेवा खात होते. या पहिल्याच भेटीत आंबेडकरांनी त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून कठोर परंतु स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘जगात अनेक महात्मे येतात आणि जातात. ते फक्त जमिनीवरील धूळ उडवितात परंतु तिची पातळी मात्र उंचावू शकलेले नाहीत.’ हे ऐकून गांधीजींच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्यातील ‘महात्मा’ डळमळीत झाला असावा. ‘गांधीजी, मला मायभूमी नाही’, असा आघात करून आंबेडकरांनी भारतातील राष्ट्रप्रेमाची वस्त्रे किती तकलादू आणि फसवी आहेत, त्यांची लक्तरे करून गांधींच्या मुखावर समोरासमोर भिरकावून दिली. जे मुळात कधी राष्ट्र नव्हतेच. आजही नाही. त्यावरील प्रेम ही शुद्ध लबाडी आहे. राष्ट्रप्रेमासाठी पहिल्यांदा भारताला राष्ट्र बनवावे लागेल, याची जाणीव आंबेडकरांनी गांधींना करून दिली. आंबेडकर राज्यशास्त्रज्ञ होते. त्यांनी गांधी- आयर्विन करारात भारतीयांच्या सार्वत्रिक आणि प्रौढ मताधिकाराच्या कलमाचा अंतर्भाव का केला नाही, म्हणून गांधींना धारेवर धरले. दुसऱ्या गोलमेज परिषदेत ‘आपणच संपूर्ण भारताचा एकमेव नेता असून काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी आहोत’, या गांधींच्या अहंकारी दाव्याला आंबेडकरांनी आव्हान देऊन भारतात गांधींव्यतिरिक्त इतरही नेते आहेत, हे भारतीयांच्या मुखातून वदविणाऱ्या तारांचा ब्रिटिश पंतप्रधानांच्या टेबलावर पाऊस पाडला. या साऱ्या गोष्टी गांधींना नव्या होत्या आणि संतापजनकही. परंतु गांधींचे मोठेपण यात होते की, ते संतापण्याऐवजी अंतर्मुख बनले. त्यांना त्यातून एका अंतर्दृष्टीचा लाभ झाला. एका अर्थाने तो महात्म्याचा नवा जन्म होता. गांधींनी आंबेडकरांशी समान पातळीवर येऊन त्यांच्याशी लंडनमध्ये बोलणी केली. पुणे कराराची कथा दोघांनी मिळून लंडनमध्येच लिहिली. त्याचा विस्तृत तपशील या ग्रंथात वाचायला मिळेल.
गांधीजीमधील या क्रांतिकारी बदलाने एकेकाळी ‘शूद्राचे ब्राह्मण होणे निंदनीय आहे, सुताराच्या मुलाने सुतारच व्हावे, लोहार बनू नये’ असे म्हणणारे गांधी स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीचा मान एका सफाई कामगाराच्या मुलीला मिळावा, असे स्वप्न पाहू लागले. गांधी मुखाने सनातन हिंदू धर्माची माळ जपत होते, परंतु कृतीने अस्पृश्यतानिवारण, आंतरजातीय सहभोजने आणि आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करीत होते. हा त्यांचा कृती कार्यक्रम सनातन हिंदू धर्माचा पायाच उखडून टाकीत होता, हे भारतातील पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि विशेषत: दलित तरुणांनी नीट समजून घेतले पाहिजे. आंबेडकरांच्या घणाघाती टीकेमुळे काँग्रेसमधील पहिल्या पिढीतील नेतृत्व खुजे, ड्वार्फ, बनण्याऐवजी विकसित होत गेले. सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौ. अबुल कलम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी इत्यादी ही त्याची उदाहरणे आहेत. दक्षिण आफ्रिकेत जे घडेल, ज्याची चिंता अॅन्ड्रयूज यांना वाटत होती ते भारतात घडले नाही. वातावरण मोकळे झालेले होते. पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून स्वदेशी येताना फेबियन सोशॅलिझमचे संस्कार घेऊन आल्यामुळे ते दोघेही सुरुवातीपासून गांधीविचारांच्या विरोधी होते. परंतु नेहरूंनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले. आंबेडकरांनी ते स्वीकारले नाही. आंबेडकर गांधीजींच्या भेटीत त्यांना सतत काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे देशाचे नेतृत्व करण्याचा सल्ला देत होते. ........Please log in to write a review.

authortest

auth@gmail.com

10:08 am, 31 Dec 2020

very nice book


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!