प्रा. डॉ. तानाजी राऊ पाटील यांनी कथा, कविता, कादंबरी आणि समीक्षा या विविध वाङ्मय प्रकारात विपुल लेखन केले आहे. संत तुकारामांचे अभंग हा त्यांच्या चिंतनाचा व आवडीचा विषय. संत तुकारामांच्या साहित्यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके बहुचर्चित ठरलेली आहेत. 'अक्षर अभंग' या नव्या ग्रंथात डॉ. तानाजी राऊ पाटील यांच्या संतसाहित्यविषयीच्या चिंतनाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकारामांपर्यतच्या संतांच्या साहित्याचा विचार आधुनिक काळाच्या संदर्भात व्यक्त झाला आहे. तसेच संतसाहित्याचा सामाजिक परिणाम, संत साहित्य आणि लोकसाहित्याचा अनुबंध, संतसाहित्यातील आख्यायिकांचा अभ्यास, त्याचा मराठी वाङ्मयावरील प्रभाव, सामाजिक तसेच भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुकारामांच्या कविता, अशा विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. मराठी कथेची वाटचाल आणि नव्या जाणिवांच्या अंगाने ग्रामीण साहित्याचा विचार यात आलेला आहे.
‘अक्षर अभंग' च्या दुसऱ्या भागात प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. कृ. ब. निकुंब, प्रा. डॉ. आनंद यादव, प्रा. फ. मुं. शिंदे, मारुती मांगोडे, राजेंद्र पाटील या लेखक कलावंतांच्या कलाकृतीचे अंतरंग उलगडले आहे. ‘अक्षर अभंग' हा ग्रंथ मराठी समीक्षेत मोलाची भर टाकणारा आहे. डॉ. तानाजी राऊ पाटील यांचा व्यासंग, विषयाची व्याप्ती, या ग्रंथातून दिसून येते. ...(पुस्तकातून)