'आदिवासी आयकॉन्स्’ ह्या ग्रंथात एकूण तीस व्यक्तीचित्रे आहेत. विशिष्ट ध्येयवादाने कार्यरत असणाऱ्या आणि आदिवासी वंचित समूहाला नव्या दिशा देण्याचे काम ज्या समाजधुरीणांनी केले, त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्त्वाचा आलेख ह्या ग्रंथात वाचायला मिळतो. जीवनाच्या संघर्षातून विधायक आणि रचनात्मक प्रेरणा घेणाऱ्या ह्या व्यक्ती संघर्षरत समूहासाठी तहहयात लढताहेत. परिवर्तनाची प्रक्रिया अत्यंत संथ असते, हे खरे असले तरी तळमळीच्या कार्यकर्त्याशिवाय ती प्रक्रिया पुढे जात नाही. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठीही ह्या ग्रंथाचा उपयोग होणार आहे.
डॉ. तुकाराम रोंगटे ह्या नव्या पिढीतील अभ्यासकाने अत्यंत जिद्दीने आणि बांधिलकीच्या भावनेतून ह्या ग्रंथलेखनाचे काम केले आहे. प्रसिध्द तसेच उपेक्षित राहिलेले सामाजिक कार्यकर्ते ह्या ग्रंथामुळे प्रकाशझोतात आले आहेत. वंचित समूहातील तरुणांना ह्या ग्रंथवाचनामुळे निश्चित प्रेरणा मिळेल, एवढे मोल ह्या ग्रंथाचे आहे. - डॉ. मनोहर जाधव