मानवसमाजातील धर्माच्या प्रगतीची अखंडता सतत दिसून येते. मनुष्य प्रथम सृष्ट पदार्थाची पूजा करू लागला. पुढे ईश्वराकडे वळला. ज्या पद्धतीने ही उत्क्रांती झाली ती एकसारखी नाही होत गेली. मधूनमधून पुन्हा पीछेहट होई. पुन्हा रस्ता बंद पडे. रान उगवे. पुन्हा ईश्वराचे नवे पाईक येत. संदेशवाहक पैगंबर येत. ते परमेश्वरासंबंधीची कर्तव्ये पुन्हा सांगत. एकमेकांत कसे वागावे पुन्हा शिकवीत. त्या त्या काळात अशा थोर विभूती होऊन गेल्या. प्रत्येक विभूती म्हणजे आध्यात्मिकतेची मूर्ती होती. तेज:किरण फेकणारी प्रकाशराशी होती. अधःपतित मानवसमाजाला वर नेण्यासाठी ते येत. पतिताला उद्धारायला येत. अशुद्धाला शुद्ध करण्यासाठी येत. अंधारात दिवा दाखवायला येत. अशा महापुरुषांपैकीच मुहंमद पैगंबर हे होत. ...(पुस्तकातून)