तमाशा कला आता बदलत आहे. तिच्या अस्तित्वाची ती मुख्य गरज आहे. परंतु तमाशा नाटक होऊ नये किंवा तो सिनेमाही बनू नये, त्याला जुन्यातील आत्मा तसाच ठेवून आधुनिकतेचा स्वीकार करावा लागेल. लावणीने मात्र आता कात टाकली आहे. लावणी नवनवी रूपे धारण करताना दिसत आहे. जोपर्यंत मराठी लावणी जिवंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा अमर राहील.
लावणीलाच नव्हे तर एकूण तमाशा कलेलाच आता नवे रूप धारण करावे लागेल. ते काम विविध प्रयोगक्षम कलावंतांचेच आहे. ही कला आणि तत्त्वज्ञान यात फारसा फरक नाही. तत्त्वज्ञानाचा जर विकास व्हावयाचा असेल तर जुन्या तत्त्वज्ञानाचा नव्या तत्त्वज्ञानाशी संयोग, संकर झाल्याशिवाय नवे तत्त्वज्ञान जन्माला येत नसते. तसेच कलांचेही आहे. अर्थातच ही एक मोठी जोखीम आहे. कारण त्यातून त्या कलेचा आत्माच निघून जाऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. - डॉ. रावसाहेब कसबे