देशांत भ्रमण मोटा हाकणं, नांगर धरणं, राखण करणं अशा अस्सल ग्रामीण कामांपासून तर आंतरराष्ट्रीय सभा संमेलनात सहभाग, असा प्रवास. संपूर्ण भारताचा कोपरान् कोपरा अनेक वेळा पाहिला. अनुभवला. अर्ध अधिक जग पाहिलं. तरीही आपला गाव, शिवार, मळे, माणसं, घटना प्रसंग जे ओल्या मनावर गोंदले गेले ते कायम पक्के. आगदी काल अनुभवल्यासारखे ते आठवतात.
तोच आलेख काढण्याचा हा प्रयत्न. पुन: प्रत्ययाचा आनंद उपभोगता येईल, नव्या पिढीला जुना काळ कसा होता, त्या काळाची जीवनशैली कशी होती याची झलक दाखवता येईल यासाठी. आजच्या बिकट स्पर्धेच्या जगात दमछाक होईपर्यंत धावणाऱ्यांना शांत-शीतल झऱ्यासारख्या झुळुझुळु वाहणाऱ्या खेडुताच्या जीवनक्रमाचा बाज गेल्या पत्रास साठ वर्षात कसाकसा बदलत गेला याची जाणीव करून देण्यासाठी हा गावरान वानवळा. …(पुस्तकातून)