आपल्या अवतीभवतीचे दगडधोंड्याचे, वृक्षवल्लीचे, पशुपक्षाचे, माणसाचे विश्व हेच इहलोकीचे ब्रह्म अशी आत्मजाणीव होणे, हेच आत्मज्ञान, हेच खरे ज्ञान हाच 'ज्ञानयोग’.
या विश्वब्रह्मातील नद्या-नाले, गिरिशिखरे, वृक्षवल्ली सोयरी वनचरे, सुखरनिर्भर पक्षी-प्राणी आणि एकच रक्त अवघ्या धमन्यांतून वाहाते आहे. ती सारी आपली माणसे - या सर्वांबद्दलचा आत्यंतिक मैत्री जिव्हाळा करुणा, प्रीती असे 'आत्मौपम्य’ हीच खरी भक्ती - हाच 'भक्तियोग’
या अवतीभवतीच्या वृक्षवल्लरीसाठी प्राणिमात्रांसाठी समाजासाठी, राष्ट्रासाठी या ‘विश्वघरा’तील अखिल मानवजातीसाठी, निःस्वार्थ भूमिकांतून समर्पित वृत्ताने कर्म करणे, हाच 'निष्काम कर्मयोग’.
त्यासाठी आपल्या पाशवी वासनांचे दमन आणि उदात्तीकरण, त्यासाठी करावयाचा मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचा इंद्रियनिग्रह हाव 'हठयोग', 'कुंडलिनीयोग', 'संन्यासयोग’.
या सर्वातून मिळणारा - मनोमनींच्या रक्तबिंदूंना पुलकित करणारा शांत आनंद हाच 'ब्रह्मानंद' अशी उदात्तशात, आनंददायिनी जीवनयात्रा जगणे हाच ‘ऐश्वर्ययोग' हाच इहलोकीचा ‘मोक्ष'.
अशी इहवादी पुनर्मांडणी या ग्रंथात केली आहे. तिला 'ज्ञानेश्वरी' संहितेचा भक्कम आधार आहे.....(पुस्तकातून)