पैंथर म्हणजे संतप्त झालेला अन शिवराळ भाषा वापरणारा युवक नाही. विद्रोही म्हणजे हिंसक युवा नव्हे, तर अहिंसक मार्गाने प्रतिकार करणारा, व्यवस्थाही बदलणारा युवक होय. आजच्या युवापीढीने हे समजून घ्यावे असे विनम्र आवाहन मी करतो. आपल्या वैचारिक शौर्याला वाचन, मनन, चिंतनाची जोड द्या. जोश असण्यापेक्षा होश असू द्या. उत्तर भारतात भीम आर्मीच्या चंद्रशेखर रावणची वाटचाल चांगली आहे; दिशादर्शक आहे. गुजरात मधील जिग्नेश मेवानी यांनी नेमका जोर धरला आहे. उमरखालीद आणि कन्हैय्या कुमार फारच प्रभावी ठरत आहेत. डावे-उजवे न करता (ढाले ढसाळची निर्मिती न करता) सर्व आंबेडकरवादी म्हणून या सर्वांचा आवाज बुलंद व्हावा असे वाटते आहे. खरोखर महाराष्ट्रात पँथर उभी राहात असेल तर छोटे, मोठे गट त्वरित बरखास्त करून सर्वांची एक कार्यशाळा घ्यायला हवीय, त्यातून नवे नेतृत्व उभे राहू शकते. कोणत्याही आरपीआयच्या वळचणीला उभे न राहता स्वतंत्र उभे राहता येते का ते पहायला हवेय. बघा अजमावून काहीतरी नवं घडेल, महाराष्ट्रातली जनता अनेक वर्षे आक्रंदते आहे. तिला उत्तम प्रतिसाद देवून खंबीर, स्वयंभू उभे रहा.