बालमन म्हणजे स्वच्छ, सुंदर, निरागस कोरी पाटी ह्या निर्मळ कोऱ्या पाटीवर केलेले संस्कार आयुष्यभर टिकतात. आजही लहानपणी वाचलेले साहित्य कथा, कविता, आपली शाळा, आपले गुरुजी, शाळेतले मित्र इत्यादी पुसटसे का होईना पण आठवतात. इतक्या वयानंतर बालपणीच्या गोष्टी आठवणे किंवा लक्षात राहणे ही विशेष बाब आहे. यात चांगल्या घटनांबरोबर वाईट घटनांचाही म्हणजेच सकारात्मक गोष्टीबरोबर नकारात्मक गोष्टींचाही समावेश असतो. म्हणूनच बालसाहित्य सृजन हे महत्त्वाचे आणि जबाबदारीचे काम आहे असे मला वाटते. आपल्या लेखणीतून नेमकं साध्य काय करायचं याचा विचार निश्चितपणे व्हायला हवा.