शास्त्रीय निकषावर मानवाच्या इतिहासाच्या प्रागैतिहासिक काल, इतिहासपूर्व काल आणि ऐतिहासिक काल अशा प्रमुख अवस्था मानल्या जातात. या प्रत्येक अवस्थेत मानवाने रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल केली. म्हणूनच 'इतिहास म्हणजे मानवी प्रगतीचा आलेख' असे म्हटले जाते. मानवी वाटचालीच्या या इतिहासातील क्रिया-प्रकियांची साखळी सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहास घडवत असते. इतिहास शिकताना तो साकल्याने समजण्यासाठी ही क्रिया प्रक्रियांची साखळी समजली तर इतिहासाचा अभ्यास आपल्या वर्तमान जीवनाचा सांधा भूतकाळाशी जोडणारा ठरतो. या दृष्टीने 'प्रारंभिक भारताचा इतिहास' महत्त्वपूर्ण आहे. आजचा भारत आणि भारताची सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक स्थिती समजून घेण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.